नवी दिल्ली : इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास ( Hamas) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने देशातील मुत्सद्दी, कर्मचारी आणि पर्यटकांसह इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी देशव्यापी अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट सर्व संबंधित सुरक्षा आस्थापने आणि पोलिसांना शेअर करण्यात आले आहे.
ज्यामध्ये काही सूचीबद्ध ठिकाणांची सुरक्षा मजबूत करण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी इस्रायली नागरिकांची जास्त ये-जा असते त्या ठिकाणीही सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, अलर्टमध्ये ऑक्टोबरमधील ज्यू सणांबद्दल सुद्धा सांगण्यात आल्याचे समजते. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने एका हिंदी न्यूज पोर्टला सांगितले की, सध्याच्या घटना पाहता इस्रायली मिशन, मुत्सद्दी, अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक प्रतिष्ठान, चाबड हाऊस, ज्यू समुदाय केंद्रे यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची विनंती करण्यात आली आहे.
याशिवाय, विविध इस्रायली पर्यटन स्थळे, इस्रायली शिष्टमंडळे, कोशेर रेस्टॉरंट्स, संग्रहालये, शाळा, रिसॉर्ट्स आणि इतर महत्त्वाच्या भागात सुरक्षा वाढवण्यास सर्व आवश्यक कायदे अंमलबजावणी संस्थांना सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना इतर आवश्यक व्यवस्थेसह पुरेशा संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यास सांगितले आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्मचाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या असून सतर्क राहण्यास सांगितले आहे.
हा अलर्ट सर्व राज्यांना पाठवण्यात आला असून तो केवळ महानगरांपुरता मर्यादित नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या ठिकाणी हे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत, त्याठिकाणीही अलर्ट पाठवण्यात आला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका असून दिल्लीने यापूर्वी इस्रायली समुदायाविरुद्ध दहशतवादी घटना पाहिल्या आहेत.
दुसरीकडे, संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्रायली सैन्याने शुक्रवारी उत्तर गाझामधील 11 लाख लोकांना 24 तासांच्या आत तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले की, या आदेशामुळे विनाशकारी मानवतावादी परिणाम होण्याचा धोका आहे.