Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास, यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. हमासशी लढण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी विरोधी पक्षांसोबत 'युनिटी' सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी लिकुड पक्षाने एक दिवस आधीच यावर सहमती दर्शवली आहे. याचाच अर्थ आता इस्रायलमध्ये एकच सरकार स्थापन केले जाईल, ज्यामध्ये सर्व पक्षांचा समावेश असेल. युद्धाच्या परिस्थितीत युनिटी सरकार किंवा युद्ध मंत्रिमंडळ तयार केले जाते. इस्रायलमध्ये 1973 नंतर पहिल्यांदाच एकता सरकारची घोषणा करण्यात आली आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. हमासने आमच्यावर हल्ला करून मोठी चूक केली आहे. हमास आणि इस्रायलच्या इतर शत्रूंच्या अनेक पिढ्या याची किंमत मोजावी लागेल. आम्हाला युद्ध नको होते, ते आमच्यावर अतिशय क्रूर पद्धतीने लादण्यात आले. आम्ही युद्ध सुरू केले नाही, पण आम्हीच ते संपवणार, असा इशारा बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला.
इस्रायलचे माजी पंतप्रधान यायर लॅपिड यांनी या युनिटी सरकारला पाठिंबा दर्शवला. युद्धाच्या परिस्थितीत विरोधी पक्ष राजकारण करणार नाही. आम्ही लष्कर आणि सरकारला पूर्ण पाठिंबा देत आहोत, असे त्यांनी म्हटले.