Israel-Hamas War: इस्रायल आणि हामस यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी साप्ताहिक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी महत्वाची माहिती दिली. ऑपरेशन अजय अंतर्गत भारतीय विमान आज रात्री इस्रायलला पोहोचेल आणि उद्या सकाळी भारतीयांना घेऊन परत येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
इस्रायलला शस्त्रे पुरवणार?परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना विचारण्यात आले की, भारत इस्रायलला शस्त्रे पुरवणार आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले, आतापर्यंत आम्हाला अशी कोणतीही विनंती आलेली नाही किंवा आम्ही अशी कोणतीही मदत करत नाही आहोत. सध्या आमचे लक्ष इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यावर आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतीय नागरिकाला परत आणण्यासाठी सध्या चार्टर्ड विमानाचा वापर केला जातो. पण गरज पडल्यास सरकार हवाई दलाचाही वापर करेल. पहिल्या फ्लाइटमध्ये सुमारे 230 नागरिकांना इस्रायलमधून भारतात आणले जाईल.
पॅलेस्टाईनबाबत भारताची एकच भूमिका आहेहमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना अरिंदम बागची म्हणाले की, हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याकडे आम्ही दहशतवादी हल्ला म्हणूनच पाहत आहोत. पॅलेस्टाईनबाबत भारताचे धोरण दीर्घकाळापासून तेच आहे. भारत नेहमीच वाटाघाटीद्वारे स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टाईनच्या निर्मितीचा पुरस्कार करत आला आहे.