Israel role In Kargil War: सध्या पेगासस स्पायवेअरवरून इस्त्रायल (Israel) आणि तेथील कंपनीविरोधात देशभरात रान उठलेले असताना इस्त्रायलने एक मोठा खुलासा केला आहे. सारा देश आज कारगिल विजय दिवस (kargil vijay diwas) साजरा करत आहे. 1999 मध्ये आजच्या दिवशी भारतीय जवानांनी कारगिल-द्रास सेक्टरमध्ये उंचावर लपलेल्या पाकिस्तानी (Pakistan Attack) घुसखोरांना पळवून लावले होते. या काळात भारतीय जवानांनी (Indian Army) प्राणांची बाजी लावत पाकिस्तानी सैन्याला पळवूनच लावले नाही तर त्यांचे कृत्य साऱ्या जगासमोर उघडे पाडले. या युद्धात भारताला सर्वात मोठी मदत करणारा जर कोणता देश असेल तो इस्त्रायल होता. (Israel's big help in Kargil War, gave laser guided miscile to India to destroy pakistani bunkers.)
22 वर्षांनी केला खुलासापाकिस्तानने अचानक हल्ला करत कारगिल ताब्यात घेतले होते. युद्धासाठी जी तयारी लागते तेवढी नव्हती, तसेच पाकिस्तानी सैन्य उंचावर असल्याने भारतीय जवानांना लक्ष्य करणे सोपे जात होते. अशावेळी मोठ्या प्रमाणावर दारुगोळा लागणार होता. ही मदत इस्त्रायलने केली होती. इस्त्रायल दुतावासाने आज ट्विट करून याची माहिती दिली आहे. ''कारगिल युद्धावेळी इस्त्रायलने भारताला उखळी तोफा आणि दारुगोळ्याची रसद पुरविली होती. त्यावेळी भारताला उघडपणे मदत करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये आम्ही होतो'', असे ट्विट केले आहे.
इस्त्रायलने म्हटले की, आम्ही या युद्धात उंचावरील पाकिस्तानी सैन्याशी लढण्यासाठी भारताच्या मिराज 2000 लढाऊ विमानांना तातडीने लेझर गायडेड मिसाईल दिली होती. हे करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा दबाव टाकण्यात आला होता. तो झुगारूनही आम्ही आमच्या मित्राला मदत केली होती. भारताने कारगिलमध्ये घुसखोरी होण्याआधी आमच्याकडे याची मागणी नोंदविली होती. परंतू, कारगिल युद्ध होणार असल्याचे संकेत मिळताच आम्ही २४ तास मेहनत घेऊन शस्त्रांचा पुरवठा केला. यामध्ये इस्त्रायलच्या तेव्हाच्या खतरनाक हेरोन अनमॅन्ड एरियल व्हेईकल (यूएवी)चा देखील समावेश होता, अशी माहिती इस्त्रायलने दिली आहे.
भारताकडे तेव्हा दुष्मनाचे बंकर उद्ध्वस्त करण्याची यंत्रणा नव्हती. तसेच टेहळणी विमानेही नव्हती. अशावेळी इस्त्रायलने आपले सारे तंत्रज्ञान भारताला दिले. सोबत ते कसे वापरावे याचे प्रशिक्षणही दिले. याच लेझर गायडेड मिसाईलनी पाकिस्तानच्या उंचावरील सैन्याला हादरा दिला होता.