Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Israel-Hamas War) यांच्यातला संघर्ष पुन्हा पेटला आहे. शनिवारी (दि.7) हमासने इस्रायलवर हजारो मिसाईल डागले, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. हमासला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने आपली लढाऊ विमानेही युद्धात उतरवली आहेत. दरम्यान, इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताकडून काय पावले उचलली गेली आहेत..?
इस्रायलवरील हल्ल्याची बातमी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली. पीएम मोदींनी ट्विट करुन म्हटले की, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. आमच्या भावना आणि प्रार्थना, या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.
दरम्यान, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनीही रविवारी म्हटले की, काल रात्री अचानक इस्रायलवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. पंतप्रधान कार्यालय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्हीदेखील तेथील लोकांच्या संपर्कात आहोत. पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारताने सर्व नागरिकांना सतर्क राहण्यास आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी भारताकडून +97235226748 हा क्रमांकही जारी करण्यात आला आहे. अॅडव्हायझरीमध्ये पुढे म्हटले की, दूतावासाचे कर्मचारी कोणत्याही मार्गदर्शनासाठी नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील. इंग्रजी तसेच हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये ही सूचना जारी करण्यात आली आहे.
एअर इंडियाने उड्डाण रद्द केलेशनिवारी इस्रायलने तेल अवीववर केलेल्या हल्ल्यानंतर एअर इंडियाने 14 ऑक्टोबरपर्यंत तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले की, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेचा विचार करुन तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
हमासच्या हल्ल्यात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू इस्रायली मीडियाने सांगितल्यानुसार, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत किमान 250 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, इस्रायलच्या हल्ल्यात त्यांचे किमान 232 लोक ठार झाले आहेत आणि 1700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.