ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.5 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसांच्या ऐतिहासिक दौ-यानिमित्ताने लोकमतच्या ऑनलाइन टीमने केलेल्या वृत्तांकनाची दखल थेट इस्रायलमध्येही घेतली गेली आहे. मोदी इस्त्रायलमध्ये पोहोचल्यावर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी ""आपका स्वागत है मेरे दोस्त"" या शब्दांत मोदींचं स्वागत केलं होतं. इस्त्रायलींनी ज्याप्रकारे लोकमतच्या वृत्ताची दखल घेतली ते पाहता लोकमतही इस्त्रायलींचा दोस्त झाला असंच म्हणावं लागेल. कारण... लोकमतने केलेल्या बातम्या, विशेष लेखांचे इंग्रजीत भाषांतर इस्त्रायलमधील सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. याशिवाय या वृत्तांकनामुळे ज्यू बांधवांच्या मनामध्येही लोकमतचं विशेष स्थान निर्माण झालं आहे.
गेल्या पन्नास ते सत्तर वर्षात इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या बेने इस्रायली नागरिकांच्या नव्या पिढीला फक्त इंग्रजी आणि हिब्रू भाषाच अवगत आहेत. लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातम्या वाचण्याची उत्सुकता या नव्या पिढीला होती पण भाषेच्या अडथळ्यामुळे ते शक्य होत नव्हते. अखेरीस मागच्या पिढीतील लोकांनीच पुढे येऊन लोकमतमध्ये प्रसिद्ध केलेले लेख इंग्रजी व हिब्रूमध्ये भाषांतरित केले. यातील काही फीचर आणि लेख सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बेने इस्रायली नागरिकांनी सर्वांना पाठवली.
लोकमतने बेने इस्रायली इतिहासकार एलियाझ दांडेकर यांचा लेख इंग्रजीतून अनुवाद करुन प्रसिद्ध केला होता, मात्र दांडेकर यांनाच तो मराठीत असल्यामुळे वाचता येत नव्हता, शेवटी त्यांच्या वृद्ध आत्याने त्याची प्रत्येक ओळ वाचून हिब्रूमध्ये समजावून सांगितली. अशीच स्थिती मुंबईचे महापौर डॉ. इ. मोझेस यांच्या लेखाबाबतही होती. सर्वांनी हा लेख सोशल मीडियावर शेअर केला, पण त्यांना मराठी वाचता येत नव्हते. हा लेख सॅम्युएल कुरुलकर यांनी इंग्रजीत प्रसिद्ध केला. लोकमतने मोझेस यांच्या कार्यावर टाकलेल्या प्रकाशाची दखल भारतीय व इस्रायली ज्यूंनी घेतली व आपल्याच बांधवाची दखल मराठी माध्यमाने घेतल्याबद्दल लोकमतचे आभारही मानले.
डॉ. इ. मोझेस हे मुंबईचे पहिले ज्यू महापौर असूनही त्यांच्याबद्दल मराठी आणि बेने इस्त्रायली लोकांनाही फारशी माहिती नव्हती, परंतू लोकमतने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल डॉ. मोझेस यांच्या वंशजांनी लोकमतचे आभार मानले आहे. लोकमतच्या इस्त्रायल वृत्तांकनाची एक झलक -
मोदींच्या इस्रायल दौ-यानिमित्ताने मुंबईच्या ज्यू महापौरांचे स्मरण...
मुंबई उपनगरी रेल्वेचे महालक्ष्मी स्थानकापासून वरळी नाक्यापर्यंत जाणारा रस्ता आज शहरातील अनेक गजबजलेल्या रस्त्यांपैकी एक आहे. एकेकाळी हेन्स रस्ता असे नाव असलेल्या या रस्त्याला आता डॉ. इ. मोझेस रोड या नावाने ओळखले जाते. वरळी नाक्यावर रस्त्याचे एक नाव सांगणारी एक पाटी सोडली तर डॉ. मोझेस "नाही चिरा नाही पणती" अशा अवस्थेत जावे इतक्या विस्मृतीत गेले आहेत. डॉ. एलिजाह मोझेस (राजपूरकर) हे मुंबईचे पहिले आणि एकमेव ज्यू धर्मिय महापौर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना सर्वात प्रथम न्यू यॉर्कमध्ये भेटले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीलाच डॉ. मोझेस हे मुंबईचे महापौर होते अशी माहिती नेत्यानाहूंना दिली. आता पंतप्रधान तीन दिवसांच्या भेटीसाठी इस्रायलला जाणार आहेत. या निमित्ताने डॉ. मोझेस यांच्या कार्याचे स्मरण करण्याची आपल्या सर्वांना संधी मिळाली आहे. आणखी वाचण्यासाठी क्लिक करा- (मोदींच्या इस्रायल दौ-यानिमित्ताने मुंबईच्या ज्यू महापौरांचे स्मरण...)
नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक-
नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक- बेने इस्रायली समुदाय हा भारतातून इस्रायलमध्ये आलेल्या पाच ज्यू समुदायांपैकी एक आहे. बेने इस्रायलींसह कोचीनी, बगदादी, बेने मनाशे, बेने एफ्राइम हे भारतातून आलेले ज्यू समुदाय इस्रायलमध्ये राहतात. बेने इस्रायली समुदाय दोन हजार वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर राहात होता. 18 व्या शतकामध्ये हा समुदाय सर्व भारतभर पसरला. या समुदायाने विविध काळामध्ये भारताच्या विकासात योगदान दिले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या आंदोलनामध्येही बेने इस्रायलींनी सहभाग घेतला होता. उदाहरणच द्यायचे झाले तर महात्मा गांधींचे वकिल आणि डॉक्टर दोघेही या समुदायाचेच सदस्य आणि दोघेही एरुलकर कुटुंबातील होते. आणखी वाचण्यासाठी क्लिक करा-(नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक)
इस्रायली शहराच्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी दिले होते बलिदान-
भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित होण्याला यंदा 25 वर्षे पुर्ण होत आहेत. याच महत्त्वाच्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देत आहेत. आजपासून सुरु झालेल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान तेथील भारतीय वंशाचे ज्यू बांधव, अनेक उद्योगांचे अध्यक्ष तसेच तेल अविव, जेरुसलेम या महत्त्वाच्या शहरांना भेट देणार आहेत. याबरोबरच हैफा या इस्रायलमधील प्राचीन शहरातील भारतीय सैनिकांच्या स्मृतीस्थळ आणि स्मशानासही ते भेट देतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटीश लष्करासाठी भारतीय जवान लढत असताना त्यांना इस्रायलमध्ये वीरगती प्राप्त झाली होती. 1918 साली इस्रायलमध्ये बलिदान देणाऱ्या या जवानांच्या स्मृतीसाठी भारतीय लष्कर आजही 23 सप्टेंबर रोजी "हैफा डे" साजरा करते. आणखी वाचण्यासाठी क्लिक करा- (इस्रायली शहराच्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी दिले होते बलिदान)