मुंबई - देशभरात हिंदी दिवस साजरा केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली एम्बेसीचं कौतुक करत इस्रायली दुतावासाकडून हिंदी देण्याच्या शुभेच्छा देताना केलेला प्रयत्न अभिमानास्पद असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. तर, ऑस्ट्रेलियाच्या हाय कमिशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या हिंदीतील शुभेच्छांचा स्वीकार करत मोदींनी ऑस्ट्रेलियानं अधिकाऱ्यांचही कौतुक केलंय.
इस्रायली दूतावासाकडून देशवासीयांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा देताना एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, हिंदी चित्रपटातील काही डायलॉग ऐकायला मिळतात. हिंदी भाषेसोबत असलेला आपलेपणा दर्शवताना दुतावासातील अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मोदींनी या व्हिडिओचं कौतुक करत उत्तर दिलंय. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन हे इस्रायली दुतावासाचे तीन स्तंभ असल्याचं मोदींनी म्हटलंय. भारतीय चित्रपटातील डायलॉगच्या माध्यमातून दुतावासाने दिलेल्या शुभेच्छा अभिमानास्पद आणि भारावून टाकणाऱ्या असल्याचंही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.
इस्रायली अधिकाऱ्यांनी अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांच्या आनंद चित्रपटापासून ते शाहरुखचा ओम शांती ओम आणि परेश रावल, सुनिल शेट्टी व अक्षय कुमारचा फिर हेराफेरी या चित्रपटापर्यंत अनेकांचे हिंदीतील डायलॉग बोलून भारतीयांना हिदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांनीही म्हणी आणि संत कबीर यांचे दोहे म्हणत देशवासीयांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कल करे सो आज कर, आज करे सो अभी... हा संत कबीर यांचा दोहा एका अधिकाऱ्याने म्हटला आहे. तर, जैसा देश, वैसा भेष, जहाँ चाह-वहा राह, सांच को आंच क्या... कोशिश करनेवालों की हार नही होती... अशा म्हणी हिंदी भाषेत म्हटल्या आहेत. त्यामुळे, या अधिकाऱ्यांचं अनोखं हिंदी प्रेम पंतप्रधान मोदींनाही आवडलं आहे. म्हणूनच मोदींकडून त्यांच्या या खास शुभेच्छांना खास ट्विटने रिप्लाय देण्यात आलाय.