ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या जुलै महिन्यात इस्त्रायल दौ-यावर जाणार असले तरी ते, शेजारच्या पॅलेस्टाईनला भेट देणे मात्र टाळणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौ-यातून भारताच्या भूमिकेबद्दल चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी भारताकडून पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा केली जाईल.
मोदी इस्त्रायलला जाण्याआधी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास भारतात येतील. मोदी यावेळी पॅलेस्टाईनला येणार नाहीत पण आमचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतील असे पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अदनान अबू अलहाईजा यांनी सांगितले. इस्त्रायलचा दौरा करणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान ठरतील.
मोदींचा हा दौरा अनेक अंगानी ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण ठरेल. भारताचे इस्त्रायलबरोबर अनेक क्षेत्रात निकटचे संबंध आहेत पण यापूर्वी भारताच्या कुठल्याही पंतप्रधानांनी त्याचे जाहीर प्रदर्शन टाळले होते. मोदींच्या इस्त्रायल दौ-यात भारताकडून हे जे संतुलन राखण्यात येतेय त्याला इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाची किनार आहे. जुलैच्या दुस-या आठवडयात हॅमबर्ग येथील जी 20 परिषद आटोपून भारतात परतताना मोदी इस्त्रायलला भेट देणार आहेत. यावर्षी भारत-इस्त्रायलच्या राजनैतिक संबंधांना 25 वर्ष पूर्ण होत आहेत.