भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) शक्तिशाली अशा कार्टोसॅट-२ या उपग्रहाला हिंदी महासागरात जलसमाधी दिली आहे. कार्टोसॅट-२ या उपग्रहाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी या सॅटेलाइटने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर हिंदी महासागरात कोसळून नष्ट झाला. याच सॅटेलाइटची पुढची पिढी असलेल्या कार्टोसॅट-२सी ने या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होऊ नये म्हणून या सॅटेलाईटला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात आणण्यात आले. कार्टोसॅट-२ या सॅटेलाइटचं प्रक्षेपण १० जानेवारी २००७ रोजी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. देशाची हाय रेझोल्युशन छायाचित्रे घेता यावीत. त्या माध्यमातून रस्ते बनवता यावेत. नकाशे तयार करता यावेत, या उद्देशाने हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला होता.
या उपग्रहाचं आयुर्मान ५ वर्षांचं होतं. मात्र तो १२ वर्षे सक्रिय राहिला.अखेरीस २०१९ मध्ये या उपग्रहाला डिअॅक्टिव्हेट करण्यात आले होते. हा हाय रेझोल्युशन इमेजिंग सॅटेलाइट मालिकेतील दुसऱ्या पिढीतील उपग्रह होता. ६८० किलोग्रॅम वजनाचा हा सॅटेलाइट सन-सिंनक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये पृथ्वीपासून ६३५ किमी उंचीवर तैनात करण्यात आला होता. २०१९ पर्यंत या उपग्रहाने देशाची उत्तमोत्तम छायाचित्रे टिपली होती. कार्टोसॅट-२ हा ३० वर्षांनी नैसर्गिकरीत्या पृथ्वीवर कोसळेल, असे सांगण्यात येत होते.
इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क सेंटरच्या सिस्टिम फॉर सेफ अँड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन्सच्या टीमने कार्टोसॅट-२ ला पृथ्वीवर समुद्रापर्यंत यशस्वीरीत्या आणले. १४ फेब्रुवारी रोजी हा उपग्रह पृथ्वीपासून १३० किमी अंतरावर असताना इलेक्ट्रिकल पॅसिव्हेशन यशस्वीरीत्या करण्यात आले होते. त्यानंतर कार्टोसॅट-२ हळुहळू पृथ्वीच्या दिशेने आला. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.४५ दरम्यान, हा उपग्रह हिंदी महासागरात यशस्वीरीत्या पाडण्यात आला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच या उपग्रहाचे बहुतांश भाग जळून खाक झाले. कार्टोसॅट-२ ला यशस्वीपणे जलसमाधी देत भारताने अंतराळात होणाऱ्या अनेक दुर्घटनांशी शक्यता संपुष्टात आणली आहे.