नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा'ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. चांद्रयान-2 या मोहिमेचं सिवन नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे.
विज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच तामिळनाडू सरकारच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातील एका शेतकऱ्याचे पुत्र कैलाशवडीवू सिवन आज इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. सिवन यांनी एका सरकारी शाळेतून तमिळ माध्यमातून शिक्षण घेतलं आहे. नागरकोयलच्या एसटी हिंदू कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाचे धडे गिरवले. सिवन यांनी 1980मध्ये मद्रास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी)मधून एयरोनॉटिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंसिज (आयआयएससी)तून इंजिनीअरिंगच्या पुढच्या शिक्षणाचे धडे गिरवले.
2006मध्ये आयआयटी बॉम्बेतून इंजिनीअरिंगमध्ये पीएचडीची त्यांनी पदवी मिळवली. सिवन पीएचडी मिळवणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांची बहीण आणि भाऊ गरिबीच्या कारणास्तव उच्च शिक्षण पूर्ण करू शकलेले नाहीत. ते म्हणाले, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा शेतात वडिलांना मदत करायचो. त्यामुळेच वडिलांनी माझं नाव घराजवळच्याच कॉलेजमध्ये घातलं. तसेच मी बीएससीला गणितात 100 गुण मिळवले, त्यावेळी माझं मन बदललं. मी कॉलेजला धोती घालून जात होतो. एमआयटीला प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच मी पँट घातली. सिवन 1982मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रत्येक रॉकेट कार्यक्रमावर काम केलं.
जानेवारी 2018मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं. त्यांनी 15 फेब्रुवारी 2017ला भारताकडून 104 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हा इस्रोचा विश्व रेकॉर्डही आहे.
चांद्रयान-2 ने प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी यानाने यशस्वीपणे पृथ्वीची कक्षा सोडली आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. इस्रोने ट्रान्स लूनर इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. स्पेसक्राफ्टचे लिक्विड इंजिन 1,203 सेकंदासाठी फायर करण्यात आले. यानंतर 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चांद्रयान-2' हे पुढील सहा दिवस चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू ठेवणार आहे. जवळपास 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून ते 20 ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल.
22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील अंतराळ तळावरून प्रक्षेपित करण्यात आलेले भारताचे ‘चांद्रयान-2’ येत्या 20 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल व ते 7 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरेल, असे के. सिवन यांनी सोमवारी सांगितले आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. सिवन येथे आले होते. ‘चांद्रयान-2’चे ‘ऑर्बिटर’, ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ हे तिन्ही भाग सुस्थितीत असून सर्व यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.