नवी दिल्लीः भारतीय अवकाश संशोधन संस्थे(ISRO)चं चांद्रयान 2 उद्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. सकाळी 8.30 ते 9.30दरम्यान चांद्रयान-2ला विशेष दिव्यातून जावं लागणार आहे. त्यासाठी इस्रोनं पूर्ण तयारी केलेली आहे. 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयान 2ला 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून बाहुबली या रॉकेटच्या सहाय्यानं प्रक्षेपित करण्यात आलं होतं. तत्पूर्वी 14 ऑगस्ट रोजी चांद्रयान 2ला चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं सोडण्यात आलं, त्यामुळेच चांद्रयान-2 हळूहळू चंद्राच्या जवळ पोहोचतोय. चांद्रयान 2ची तंदुरुस्ती आणि त्याच्या मार्गाची निगराणी इस्रोचे तीन सेंटर्स करत आहेत. मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स (MOX), इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) आणि इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) यांचा यात समावेश आहे.इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन म्हणाले, चांद्रयान 2ला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना कठोर आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती 65000 किमीपर्यंत राहते. अशातच चांद्रयान 2ची गती कमी करावी लागणार आहे. अन्यथा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावात येऊन चांद्रयान 2 इतर ठिकाणीही धडकू शकते. चांद्रयान 2ची गती कमी करण्यासाठी ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टम थोड्या वेळासाठी चालू करावं लागणार आहे. यादरम्यान एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. ही फक्त चांद्रयान 2चीच परीक्षा नव्हे, तर इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठीही कठोर आव्हान आहे.चांद्रयान 2नं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या चहूबाजूंनी हे यान फिरत राहणार आहे. चांद्रयान 2ला चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेपर्यंत नेण्यासाठी चार वेळा त्याची कक्षा बदलावी लागणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा या यानावर बसवण्यात आली आहे. मोहिमेतील सर्व यंत्रणा या भारतीय बनावटीच्या आहेत. या मोहिमेंतर्गत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगद्वारे रोव्हर वॉक होणार होते.
Chandrayaan 2: इस्रोच्या शास्त्रज्ञांची उद्या कठीण परीक्षा; एक तास धडधड वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 8:38 PM