नवी दिल्ली : 'चांद्रयान 2' मोहिमेतील शेवटचा टप्पा पार पडताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरापासून दूर असतानाच हा तुटला. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम आहे. विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
चंद्रावर उतरण्यासाठी अवघे दोन किलोमीटरचे अंतर शिल्लक असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. विक्रम लँडरचे चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना पर्यंतचे काम सामान्य होते. त्यानंतर विक्रम लँडरचा इस्त्रोसोबत असलेला संपर्क तुटला. यासंदर्भात विश्लेषण करण्यात येत आहे, असे इस्त्रोकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इस्रो प्रमुख के. सिवन यांनी सांगितले की, विक्रम लँडरसोबत पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील 14 दिवस आम्ही विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चांद्रयान-2 मोहीम जवळपास 95 टक्के यशस्वी झाली आहे. चंद्रयान-2 चा ऑर्बिटर जवळपास 7.5 वर्षापर्यंत काम करु शकतो. तसेच, गगनयानसह इस्रोच्या अन्य अंतराळ मोहिमादेखील वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी के. सिवन यांनी दिली.
याचबरोबर, इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनीही चांद्रयान-2 मोहीम 95 टक्के यशस्वी झाले असल्याचे म्हटले आहे. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत असून त्याच्याकडून अधिक चांगले छायाचित्र मिळण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले आहेत.