चांद्रयान-3 मोहीम फत्ते करून इस्रोने संपूर्ण जगाला आश्चर्य चकित केले. एवढेच नाही, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून विविध प्रकारची महत्त्वाची माहिती एकत्र करून ती जगासमोर आणली. भारताच्या या ऐतिहासिक महापराक्रमाने पाकिस्तान आणि चीनला झालेली पोटदुखीही जगानं पाहिली. भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, असे तारे चीनच्या शास्त्रज्ञाने तोडले होते. मात्र असे असतानाही भारताने चिनी अंतराळ मोहिमांचे कौतुक केले आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चिनी माध्यम समूह CGTN ला मुलाखत देताना यासंदर्भात भाष्य केले आहे.
इस्रो प्रमुख एस सोमनाथ म्हणाले, ''आम्ही अंतराळ क्षेत्रातील चीनची वृद्धी पाहिली आहे. ती खरोखरच छान आहे. मला वाटते की आपण तंत्रज्ञान क्षमतेसंदर्भात, नवीन प्रणाली आणि आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यावर अधिक भर देत आहात आणि नव्या मोहिमा सुरू करत आहात. हे आपल्यासाठी अत्यंत दिशादर्शक ठरेल. आपण जे काम करत आहात त्याचे मी कौतुक करतो. अंतराळ क्षेत्रासाठी आपल्या दीर्घकालीन दृष्टीशीही हे मेळ खाते." याशिवाय, अवकाश क्षेत्रासाठी अनेक उद्योगही पुढे येत असल्याचे मला दिसत आहे, असेही सोमनाथ म्हणाले.
"भारतात पूर्वी असे नव्हते. आमचे उद्योग कमी-अधिक प्रमाणात उत्पादनात गुंतले आहेत. मूळ डिझाइन अथवा स्पेससाठी मार्केट बनवण्यात नाही. यामुळे, भारत आणि चीनमध्ये अंतराळ क्षेत्राचा विस्तार करायचा असेल, तर बाजारांवर अवलंबून रहावे लागेल. तसेच, याचा उपयोग या क्षेत्रात आणि क्षेत्राबाहेर कशा प्रकारे केला जाऊ शकतो, हेही आपल्याला पाहावे लागेल. हे चीनलाही तेवढेच लागू असेल," असेही सोमनाथ म्हणाले.