ISRO Chandrayaan 3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चंद्रयान ३ मोहीम यशस्वी करून ऐतिहासिक कामगिरी केली. काही दिवसांपूर्वी चंद्रावर सूर्यास्त झाल्यानंतर प्रग्यान आणि विक्रम झोपी गेले. चंद्रावर सूर्यास्त झाल्यानंतर झोपी गेलेले विक्रम रोव्हर आणि प्रग्यान लँडर यांना जागे करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. चंद्रावर सूर्योदय व्हायला सुरुवात झाली आहे. ‘शिवशक्ती’ पॉइंटवरून आनंदाची बातमी कधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
चंद्रावर १४ दिवसांचे दिवस आणि रात्र असतात. इस्रोने सूर्यास्तानंतर ४ सप्टेंबर रोजी लँडरला, तर त्या आधी २ सप्टेंबर रोजी रोव्हरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. इस्रोने लँडर-रोव्हरचे रिसिव्हर्स सुरू ठेवले आहेत. १४ दिवसांच्या अंधारानंतर सूर्यप्रकाश पुन्हा एकदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचू लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी दोघांना जागे करून संपर्क स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांकडून कोणतेही सिग्नल प्राप्त झाले नाही. यानंतर आता इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे.
‘प्रग्यान’, ‘विक्रम’ कधी जागे होणार?
काळजी करण्याची गरज नाही. विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरला असे तंत्रज्ञान पाठवण्यात आले आहे की, त्यांना सूर्यप्रकाशापासून पूर्णपणे ऊर्जा मिळेल. ते आपोआप जागे होतील. म्हणजेच ते आपोआप सक्रिय होईल. फक्त इथून पुढे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे आहे. अजून १३-१४ दिवस बाकी आहेत, असे इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी स्पष्ट केले. या दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी विक्रम आणि प्रग्यान यांच्याकडून चांगली बातमी येऊ शकते. चंद्रावर पुन्हा सूर्यास्त होण्यापूर्वी म्हणजेच शिवशक्ती पॉइंटवर पुन्हा अंधार पडण्यापूर्वी चांगली बातमी येऊ शकते. अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले होते की, इस्रो लँडर-रोव्हरला जागे करण्याचा प्रयत्न करेल. सध्या लँडर-रोव्हर निष्क्रिय आहे. जोपर्यंत तिथून प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत हा प्रयत्न सुरूच राहणार आहे.
दरम्यान, चंद्रावर सूर्योदय झाला आहे. सकाळ झाल्याने प्रकाश पूर्णपणे उपलब्ध आहे. पण चंद्रयान ३ च्या लँडर आणि रोव्हरला अद्याप पुरेशी ऊर्जा मिळालेली नाही. चंद्रयान ३ वरून अनेक इनपुट मिळाले आहेत. इस्रोचे शास्त्रज्ञ याचा सखोल अभ्यास करत आहेत. गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारीचेही विश्लेषण केले जात आहे. तत्पूर्वी, विक्रम लँडरने शनिवारी स्वतःला ४० सेंटिमीटरपर्यंत वर उचलत ३० ते ४० सेंटिमीटर अंतरावर पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग करण्याची कामगिरी केली.