नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (Isro) आतापर्यंत अनेक मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत. जगात बड्या देशांना जमल्या नाहीत, अशा मोहिमा भारताने यशस्वी केलेल्या आहेत. यातच आता परकीय देशांचे उपग्रह प्रक्षेपित करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ देशांचे १७७ उपग्रह प्रक्षेपित करून इस्रोने एक हजार कोटीहून अधिकची कमाई केली आहे.
इस्रो ही सरकार नियंत्रित संस्था आहे. मंगळयान, चांद्रयान अशा मोहिमांमुळे जगात इस्त्रोचे नाव आदराने घेतले जात असून अत्याधुनिक उपग्रह बनवणारी संस्था म्हणूनही इस्त्रोचा लौकिक आहे. एवढंच नाही तर जगात सर्वात स्वस्तात उपग्रह पाठवणारी संस्था म्हणूनही इस्रोची आणखी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. एकेकाळी स्वतःचे उपग्रह दुसऱ्या देशांच्या सहाय्याने बनवत अवकाश पाठवण्यासाठी त्यांचेच सहाय्य घेणारी इस्रो आता फक्त स्वतःचेच नाही तर इतर देशांचे उपग्रह अवकाशात पाठवत आहे.
१९ देश आणि विविध संस्थांचे तब्बल १७७ उपग्रह प्रक्षेपित
जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०२२ या पाच वर्षात १९ देशांचे आणि त्यांमधील विविध संस्थांचे तब्बल १७७ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामधून ९४ दशलक्ष डॉलर आणि ४६ दशलक्ष युरो एवढे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच एकूण तब्बल १ हजार १०० कोटी रुपये कमावले आहेत. ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, कोलंबिया, फिनलॅड, फ्रान्स, इस्राइल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका या देशांचे किंवा या देशातील विविध संस्थांचे उपग्रह गेल्या पाच वर्षात इस्रोने अवकाशात प्रक्षेपित केले आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षात इतर देश त्यांचे उपग्रह, जगभरातील विद्यापीठ तसेच संशोधन संस्था उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी भारताच्या या इस्रोकडे रांग लावून येत आहेत. म्हणूनच असे उपग्रह प्रक्षेपित करत, अवकाशात अचूकरित्या पाठवत इस्रोने आता बक्कळ कमाई करायला सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील धोरणात बदल केला. देशातील खाजगी संस्थांना उपग्रह बनवणे, प्रक्षेपित करण्याठी प्रक्षेपक – रॉकेट तयार करणे तसंच या क्षेत्राशी संबंधित विविध उपकरणे बनवणे यासाठी नियमात बदल केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"