Isro Gaganyaan Mission: अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO)ने आपला महत्वकांशी प्रोजेक्ट चंद्रयान-3 लॉन्च केला. या यशस्वी उड्डानानंतर आता इस्रो भीमपराक्रम करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी इस्रोला गगनयानाद्वारे मानवाला अंतराळात पाठवण्याच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे.
महत्वाची चाचणी यशस्वी
गगनयान मिशनच्या सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टमची (SMPS) गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. SMPS गगनयान ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा पूर्ण करते. तमिळनाडूमधील महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये हॉट चाचणीचे अंतिम कॉन्फिगरेशन घेण्यात आले. गगनयान मोहीम पुढील वर्षी सुरू होणार असून, इस्रोची जोरदार तयारी सुरू आहे.
हवाई दलातील तिघांची निवड
केंद्र सरकारने गगनयान मोहिमेसाठी इस्रोला 10 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अंतराळात भारताची ही पहिली मानवी मोहीम असेल. गांभीर्य पाहता इस्रोमध्ये याबाबत सविस्तर चाचण्या केल्या जात आहेत. गगनयानच्या माध्यमातून अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर पाठवण्याची इस्रोची योजना आहे. या संदर्भात भारतीय हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे. हवाई दलाला अंतराळवीरांची निवड करण्यास सांगितले आहे.
भारतासाठी सर्वात मोठी मोहिमगगनयान हा इस्रोच्या तीन अंतराळ मोहिमांचा समूह आहे. यामध्ये दोन मोहिमा मानवरहित आहेत, तर तिसर्या मोहिमेत मानवालाही अवकाशात पाठवले जाणार आहे. या मोहिमेत तीन अंतराळवीर पाठवले जातील, त्यापैकी दोन पुरुष आणि एक महिला असेल. इस्रोने पृथ्वीच्या सर्वात जवळच्या कक्षेत (लोअर ऑर्बिट) मानवी वाहन पाठवण्याची योजना आखली आहे. गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या निवडक देशांच्या यादीत भारतही सामील होईल.