नवी दिल्ली: चंद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रोनं नव्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या नव्या मोहिमेमुळे देशाची संरक्षण सज्जता आणखी वाढेल. यंदाच्या वर्षात इस्रो कार्टोसॅट-३ उपग्रह सोडेल. संरक्षणाच्या दृष्टीनं कार्टोसॅट-३ महत्त्वाची भूमिका बजावेल. इस्रोमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये कार्टोसॅट-३ अवकाशात झेपावेल. अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशानं कार्टोसॅट-३ चं प्रक्षेपण करण्यात येईल. नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचं, विकासकामांना सहाय्य करण्याचं काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-३ पार पाडेल. या उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे. पाकिस्तानच्या जमिनीवरील अगदी बारीकसारीक हालचाली टिपण्याची क्षमता कार्टोसॅट-३ मध्ये असेल. याचा मोठा फायदा भारतीय सैन्याला होईल. कार्टोसॅट-३ हा कार्टोसॅट मालिकेतील नववा उपग्रह आहे. या उपग्रहातील कॅमेरा अतिशय शक्तीशाली असेल. जमिनीवर असलेल्या माणसाच्या मनगटावरील घड्याळातील वेळ दाखवू शकेल, इतकी क्षमता कार्टोसॅट-३ मधील कॅमेऱ्यात असेल. फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. विविध वातावरणात पृथ्वीची छायाचित्र घेण्याची क्षमता कार्टोसॅट-३ मध्ये आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्याचं कामदेखील हा उपग्रह करेल.
आता सर्जिकल स्ट्राईक आणखी अचूक होणार; आकाशातून शत्रूच्या हातातलं घड्याळही दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 5:03 PM