नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी एकाच वेळी ब्रिटनचे ५८.५ किलोंचे तब्बल ३६ उपग्रह प्रक्षेपित करून, या क्षेत्रात आपले वर्चस्व अधोरेखित केले. या मोहिमेला ‘एलव्हीएम३-एम-३/वनवेब इंडिया-२’ असे नाव देण्यात आले आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटाच्या स्पेसपोर्टवरून सकाळी ९.०० वाजता उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
या रॉकेटचे यश आणखी एका दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी याच रॉकेटचा वापर होणार आहे. त्यामुळे मोहिमेसाठी ते उपयुक्त असल्याचे यावरून स्पष्ट झाल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.या मोहिमेत इस्रोचे ४३.५ मीटर लांबीचे एलव्हीएम-३ रॉकेट (जीएसएलव्ही-एमके-३) वापरले गेले. हे इस्रोचे सर्वांत वजनदार रॉकेट आहे. दुसऱ्या लॉन्चपॅडवरून ते प्रक्षेपित झाले.
या प्रक्षेपण पॅडवरून चांद्रयान-२ मोहिमेसह पाच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहेत. त्याचे हे सहावे यशस्वी उड्डाण आहे. रॉकेटचे प्रक्षेपण पाहण्यासाठी अनेक लोक श्रीहरिकोटा येथे आले होते. रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर लोकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. वनवेबने एनआयएसआयएलबरोबर ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी करार केला आहे. त्या अंतर्गत हे दुसरे प्रक्षेपण होते. वनवेब ग्रुप कंपनीचे पहिले ३६ उपग्रह २३ ऑक्टोबर, २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले.
अभिनंदनाचा वर्षाव
इस्रोने ट्वीट करून यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली. वनवेबचे ३६ उपग्रह १६ फेब्रुवारीलाच फ्लोरीडाहून भारतात आणण्यात आले. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी एनआयएसआयएल, इस्रो व वनवेबचे यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केले. प्रक्षेपणाबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे कौतुक केले.
६ कंपन्यांची भागीदारी
नेटवर्क ॲक्सिस असोसिएटेड लिमिटेड म्हणजेच वनवेब ही ब्रिटन स्थित दूरसंचार कंपनी आहे. त्याची मालकी ब्रिटिश सरकार, भारताची भारती एंटरप्रायझेस, फ्रान्सची युटेलसॅट, जपानची सॉफ्टबँक, अमेरिकेची ह्युजेस नेटवर्क्स आणि दक्षिण कोरियाची संरक्षण कंपनी हानव्हा यांच्याकडे आहे.