चेन्नई - चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर आता इस्रोने नव्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या नव्या मोहिमेमुळे देशाची संरक्षण सज्जता आणखी वाढली आहे. पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे बुधवारी (27 नोव्हेंबर) प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार कार्टोसॅट-3 सोबत 13 नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण झाले आहे.
पीएसएलव्ही-सी 47 च्या प्रक्षेपण मोहिमेच्या 26 तासांच्या उलटमोजणीला मंगळवारी सकाळी 7.28 वाजता श्रीहरिकोटात सतीश धवन स्पेस सेंटरवर सुरुवात झाल्याची माहिती इस्रोने दिली होती. यंदाच्या वर्षात इस्रो कार्टोसॅट-3 उपग्रह सोडला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने कार्टोसॅट-3 महत्त्वाची भूमिका बजावेल. अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने कार्टोसॅट-3 चे प्रक्षेपण करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचं, विकासकामांना सहाय्य करण्याचं काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-3 पार पाडणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे. पाकिस्तानच्या जमिनीवरील अगदी बारीकसारीक हालचाली टिपण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याचा मोठा फायदा भारतीय सैन्याला होईल.
कार्टोसॅट-3 हा कार्टोसॅट मालिकेतील नववा उपग्रह आहे. या उपग्रहातील कॅमेरा अतिशय शक्तीशाली असेल. जमिनीवर असलेल्या माणसाच्या मनगटावरील घड्याळातील वेळ दाखवू शकेल, इतकी क्षमता कार्टोसॅट-3 मधील कॅमेऱ्यात असेल. फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. विविध वातावरणात पृथ्वीची छायाचित्र घेण्याची क्षमता कार्टोसॅट-3 मध्ये आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्याचं कामदेखील हा उपग्रह करेल.
चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोला आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता. मात्र या अपयशातून सावरत आता इस्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर सध्या वेगाने काम सुरू असून, पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात इस्रोचे चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान लँडरला चंद्राच्या पृष्टभागावार यशस्वीरीत्या उतरवण्यात अपयश आल्यानंतर इस्रोने चंद्रावर पुन्हा एकदा झेप घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी इस्रोने विविध समित्यांची नियुक्ती केली आहे. तसेच तीन उपसमित्यांच्या पॅनलसोबत उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.