बंगळुरू : भारताच्या मंगलयानातील बॅटरी व प्रणोदकही संपल्यामुळे देशातील पहिली आंतरग्रहीय मोहीम अखेरीस प्रदीर्घ कालावधीनंतर संपुष्टात आल्याचे समजले जात आहे. (वृत्तसंस्था)
सलग चालल्याने फटका
इंधनाच्या साहाय्याने यानाला ग्रहणाचा फटका बसू नये यासाठी नवीन कक्षेत नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता; परंतु अलीकडेच एकापाठोपाठ एक ग्रहण झाले व ते साडेसात तास चालल्याचा फटका बसला. बॅटरी केवळ १ तास ४० मिनिटांचा ग्रहण कालावधी सहन करण्याच्या क्षमतेची आहे. प्रदीर्घ चाललेले ग्रहण बॅटरी निकामी करते.
८ वर्षे कामगिरी
मार्स ऑर्बिटर क्राफ्टने सुमारे ८ वर्षे काम केले. वास्तविक पाहता ते ६ महिने काम करण्यासाठी तयार करण्यात आलेले होते. त्याने आपले काम चोख बजावले आहे व महत्त्वपूर्ण वैज्ञानिक निष्कर्ष नोंदविलेले आहेत, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
१००० पेक्षा जास्त छायाचित्रे पाठविली
मंगळ मोहिमेचा उद्देश मुख्यत: तांत्रिक स्वरूपाचा होता. यानाने मंगळाच्या पृष्ठभागावरील बारीकसारीक तपशील नोंदवणे, वैशिष्ट्ये गोळा करणे, तापमान नोंदवणे, वातावरणातील प्रक्रिया नोंदविण्यासाठी १५ किलोची ५ उपकरणे बरोबर नेली होती. मार्स कलर कॅमेरा, थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर, मंगळासाठी मिथेन सेन्सर, मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कंपोजिशन अनलायजर व लिमन अल्फा फोटोमीटरचा समावेश होता. या यानामुळे भविष्यातील अनेक मोहिमांसाठी नवे दालन खुले झाले. मंगलयानाच्या अत्याधिक अंडाकार कक्षेमुळे दूरवरील पूर्ण डिस्क स्नॅप शॉट घेण्यास तसेच निकटतम बिंदूचे अतिसूक्ष्म तपशील घेण्यास सक्षम करण्यात आले होते. यानाने १,००० पेक्षा अधिक छायाचित्रे घेतली व मंगळाचा नकाशा तयार केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"