ISRO : (Marathi News) नवी दिल्ली : हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आज एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हवामानाची अचूक माहिती देणारा INSAT-3DS हा उपग्रह आज म्हणजेच १७ फेब्रुवारीला प्रक्षेपित होणार आहे. इस्रोने या उपग्रहाला ‘नॉटी बॉय’ असे टोपणनाव दिले आहे.
इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेईकल (जीएसएलव्ही-एफ१४) शनिवारी संध्याकाळी ५:३५ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ‘इन्सॅट-३ डीएस’ उपग्रहासह उड्डाण करणार आहे. तसेच, इस्रोने सांगितले की, उपग्रहाची रचना जमीन आणि महासागराच्या पृष्ठभागावर चांगल्या प्रकारे हवामानविषयक निरीक्षणे, हवामानाचा अंदाज आणि आपत्ती चेतावणी देण्यासाठी करण्यात आली आहे.
‘इन्सॅट-३ डीएस’ हा तिसऱ्या पिढीचा अपग्रेड केलेला, हवामानशास्त्रीय उपग्रह आहे. इस्रोच्या एका माजी अध्यक्षांनी त्याला ‘नॉटी बॉय’ म्हटले होते. त्याचे वजन २,२७४ किलोग्रॅम आहे आणि तो सुमारे ३८० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, उपग्रह पृथ्वी विज्ञान, हवामानशास्त्र विभाग (IMD), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT), हवामान अंदाज केंद्र आणि भारतीय राष्ट्रीय केंद्र अंतर्गत विविध विभागांसाठी काम करेल.
याचबरोबर, ५१.७ मीटर लांबीचे हे रॉकेट इमेजर पेलोड, साउंडर पेलोड, डेटा रिले ट्रान्सपॉन्डर आणि सॅटेलाइट एडेड सर्च आणि रेस्क्यू ट्रान्सपॉन्डर घेऊन जाईल. ढग, धुके, पाऊस, बर्फ, आग, धूर, जमीन आणि महासागर यावर संशोधन करण्यासाठी याचा वापर केला जाईल. त्यामुळे हवामानाचा अधिक अचूक अंदाज वर्तविता येणार आहे.