बंगळुरू : चांद्रयान-२च्या विक्रम लॅण्डरशी संपर्क साधून त्यातील रोव्हर प्रज्ञानचा उपयोग करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) आता वेळेशी स्पर्धा सुरू झाली आहे. कारण या लॅण्डरचे आयुष्य १ चांद्रदिवसाचे (म्हणजेच पृथ्वीवरील सुमारे १४ दिवसांचे) आहे. त्यामुळे या वेळेच्या आत त्याच्याशी संपर्क साधण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.
शनिवारी पहाटे चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग करण्याच्या प्रयत्नात असताना लॅण्डर विक्रमचा इस्रोशी संपर्क तुटला. त्यावेळी तो पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रहाच्या (चंद्राच्या) २.१ किलोमीटरवर होता. लॅण्डर विक्रमच्या आत रोव्हर प्रज्ञान आहे. इस्रोने मंगळवारी सांगितले की, चांद्रयान-२च्या आॅर्बिटरमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी लॅण्डरचे ठिकाण शोधण्यात आले आहे. ऑर्बिटर त्याच्या निर्धारित कक्षेत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालीत आहे.
इस्रोने एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, लॅण्डरशी संपर्क साधण्याचे हरप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेशी संबंधित एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले की, लॅण्डर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर सुस्थितीत आहे. तो तुटलेला किंवा फुटलेला नाही, हे आॅर्बिटरच्या कॅमेºयाने टिपलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट झाले आहे. तो झुकलेल्या अवस्थेत आहे. म्हणजेच तो चाकांवर उभा नाही.इस्रोच्या एका अधिकाºयाने सांगितले की, लॅण्डर जेथे उतरणे अपेक्षित होते, त्याच्या सुमारे ५०० मीटर अंतरावर तो पृष्ठभागावर धडकला. लॅण्डरच्या अँटिनाला पृथ्वीवरून सरळ करता येईल का, यासाठी शास्त्रज्ञांचे एक पथक कार्यरत आहे.