भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ मोहीम चंद्राकडे झेपायला सज्ज झाली आहे. १४ जुलैला दुपारी २.३५ वाजता होणाऱ्या उड्डाणाकडे अवघ्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे. भारताची ही मोहिम यशस्वी व्हावी आणि आंताराळात पुन्हा एकदा भारताचं स्थान बलशाली व्हावं यासाठी देश प्रार्थना करत आहेत. त्यातच. इस्रोचे अधिकारी आज तिरुपती वेंकटचलापथीच्या मंदिरात दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी पोहोचले आहेत. वैज्ञानिकांच्या एका टीमने चांद्रयान ३ चे लहान मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात पूजा केली.
चांद्रयान ३ या मोहिमेसाठी इस्रोने चांद्रयान-२ च्या यशस्वी डिझाईनऐवजी फेल्युअर बेस्ड डिझाईनचा पर्याय निवडला आहे. परंतु मोहिमेदरम्यान कोणत्या गोष्टी अपयशी ठरू शकतात, त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर भर दिला असल्याचे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले. दरम्यान, इस्रोच्या वैज्ञानिकांनी आज तिरुपती वेंकटाचलापथी मंदिरात चांद्रयान ३ चं प्रतिकृती मॉडेल घेऊन पूजा-आरती केली. तसेच, भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थनाही केली. यावेळी, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हेही मंदिरात हजर होते. दरम्यान, यापूर्वी चांद्रयान २ च्या लाँचिंग वेळीही इस्रोचे तत्कालीन प्रमुख त्यांच्या टीमसह मंदिरात दर्शनासाठी आले होते.
चौथा देश ठरणार
चंद्रावर यशस्वी लॅण्डिंग झाल्यास भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरेल. २३ ऑगस्टनंतर कधीही हे यान चंद्रावर उतरू शकते.
एलव्हीएम ३ द्वारे उड्डाण
चांद्रयान -३ च्या उड्डाणासाठी इस्रोने एलव्हीएम ३ प्रक्षेपक विकसित केले आहे. देशातील आतापर्यंतचे हे सर्वात अवजड आणि अद्ययावत प्रक्षेपक आहे. त्याचे वजन ६४० टन इतके आहे.
चांद्रयान १ आणि २ अपयशी ठरल्यानंतर इस्रोने चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लॅण्डिंग करण्यावर भर दिला आहे. सुरक्षित लॅण्डिंगसाठी इस्रोने ४ किमी x २.५ किमी इतके क्षेत्र वाढविले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक लॅण्डिंग ठिकाण निश्चित केले आहे, परंतु काही कारणास्तव ते शक्य न झाल्यास नजीकच्या योग्य ठिकाणी ते उतरवण्यात येईल. अतिरिक्त इंधनही उपलब्ध केल्याने यशस्वी लॅण्डिंग होईल, असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला.
वेळ हुकल्यास नव्याने मोहीम
१४ जुलैला दुपारी २.३५ चांद्रयान -३ चे उड्डाण निश्चित केले आहे. काही कारणास्तव ही वेळ हुकल्यास नवी तारीख आणि वेळ निश्चित केली जाईल. परंतु ती मोहीम पूर्णपणे नव्याने आखण्यात येईल, असेही सोमनाथ यांनी सांगितले.
आगामी मोहीम जपानसोबत
चांद्रयान-३ नंतर इस्रो पुढील चांद्रमोहीम जपानच्या सहकार्याने राबविणार आहे. त्यासाठी जपानने लॅण्डरची निर्मिती करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या तांत्रिक पातळीवर चर्चा सुरू आहे. - एस. सोमनाथ, इस्रो प्रमुख