भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो नवीन वर्षात विविध अवकाश मोहिमांसाठी सज्ज झाली आहे...
चांद्रयान-३दोन वर्षांपूर्वी इस्रोचे अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले आणि त्यामुळे मोहीम अयशस्वी झाली. आता चांद्रयान- ३ मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, चांद्रयान- ३ ची मोहीम नवीन वर्षात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मानवरहित चाचणी यशस्वी झाल्यानंतर २०२४ च्या अखेरीस भारतीय अंतराळवीरांना कक्षेत पाठविण्याची इस्रोची योजना आहे.
गगनयान मोहीमकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले होते की, २०२३ च्या शेवटच्या तिमाहीत गगनयान कार्यक्रमासाठी मोहीम सुरू करण्यात येईल. रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वत:च्या रॉकेटच्या - प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तीत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेपूर्वी गगनयानची तयारी सिद्ध करणाऱ्या दोन मोहिमा होणार आहेत. एका मोहिमेवर एक मानवी रोबोटही पाठवला जाणार आहे.
सूर्यावर स्वारी सूर्याचे अध्ययन करणारे आदित्य एल- १ हे भारताचे पहिले मिशन असणार आहे. या मोहिमेद्वारे इस्रोला सूर्याची रहस्ये आणि पृथ्वीशी असलेला संबंध आणि त्याचे परिणाम याबाबत माहिती मिळणार आहे. या मोहिमेद्वारे सूर्याचा तपशीलवार अभ्यास इस्रोकडून केला जाणार आहे. या मोहिमेत पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर दूर असलेला सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करण्यात येणार आहे. कारण, पृथ्वीवरील वातावरणीय बदलामध्ये हाच घटक मोठी भूमिका बजावतो. सूर्याची नवीन रहस्ये शोधण्यासाठी ‘आदित्य’ लवकरच हनुमान उडी घेत इस्राेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार आहे.
संकलन : विलास शिवणीकर