ISRO reschedules Proba-3 launch: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गेल्या काही वर्षांमध्ये खूप प्रगती केली आहे. इस्रो सातत्याने आपल्या अंतराळ मोहिमा राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून, आज PSLV-C59 रॉकेट/PROBA-3 मिशन लॉन्च केले जाणार होते. पण, काही तांत्रिक बिघाडामुळे ही योजना पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे मिशन उद्या श्रीहरिकोटातून संध्याकाळी 4:12 वाजता लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
इस्रोने या संदर्भात सांगितले की, 'प्रोबा-3' मध्ये आढळलेल्या काही त्रुटींमुळे PSLV-C59 चे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. यानुसार, प्रोबा-3 अंतराळ यानामध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे प्रक्षेपण उद्या 4:12 वाजता केले जाईल.
PROBA-3 मिशन काय आहे ?ISRO चे PROBA-3 मिशन हा युरोपमधील अनेक देशांचा भागीदारी प्रकल्प आहे. यामध्ये स्पेन, पोलंड, बेल्जियम, इटली आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे. या मोहिमेची किंमत अंदाजे 200 मिलियन युरो आहे. प्रोबा-3 मिशन सुमारे 2 वर्षे चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मोहिमेची विशेष बाब म्हणजे या मोहिमेच्या मदतीने अंतराळात 'प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइंग'ची चाचणी घेण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत दोन उपग्रह एकत्र अवकाशात उड्डाण करतील.
PROBA-3 मिशन सूर्याच्या कोरोनाचा, म्हणजेच सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरील आणि सर्वात उष्ण थराचा अभ्यास करेल. सूर्याच्या बाह्य वातावरणाला सूर्याचा कोरोना म्हणतात. ISRO ची व्यावसायिक शाखा NewSpace India Limited (NSIL) या मोहिमेत सहकार्य करत आहे. इस्रोने यापूर्वी दोन प्रोबा मोहिमा सुरू केल्या आहेत. 2001 मध्ये पहिले प्रक्षेपण PROBA-1 चे केले होते , तर दुसरे PROBA-2 मिशन 2009 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. या दोन्ही मोहिमांमध्ये इस्रोला यश आले आहे.