भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) च्या चंद्रयान-३ मोहिमेकडे भारतासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय परिसरात विक्रम लँडर यशस्वीरीत्या उतरल्यानंतर भारताचा प्रज्ञान रोव्हर हा चंद्राच्या पृष्टभागावर भ्रमण करत आहेत. या ठिकाणाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिव-शक्ती पॉईंट असं नामकरण केलं आहे. यादरम्यान, इस्रोने या मोहिमेचे तीन हेतू सांगितले आहे. त्यामधील दोन कामं पूर्ण झाली आहेत. तर तिसऱ्या उद्देशावर काम सुरू आहे.
इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून त्यांनी सांगितले की, चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचं काम पूर्ण झालं आहे. चंद्रावर रोव्हर फिरवण्याचं कार्य पूर्ण झालं आहे. या वैज्ञानिक प्रयोगाचं संचालन सुरू आहे. सर्व पेलोड सर्वसामान्यपणे काम करत आहेत. याआधी इस्रोने शनिवारी संध्याकाळी चंद्रावर फिरणाऱ्या प्रज्ञान रोव्हरचा व्हिडीओ शेअर केला होता. चंद्रयान-३ मधील रोव्हर प्रज्ञान दक्षिण ध्रुवावरील शिवशक्ती पॉईंटवर सातत्याने भ्रमण करत आहे.
दरम्यान, इस्रोने शुक्रवारी सांगितलं होतं की, चंद्रयान-३ चा रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्टभागावर सुमारे आठ मीटर चालला. त्याची सर्व उपकरणे योग्य पद्धतीने काम करत आहेत. इस्रोने सांगितले होते की, रोव्हर सर्व नियोजित कामं करत आहेत. तसेच रोव्हरमधील एलआयबीएस आणि एपीएक्स सुरू आहे.