नवी दिल्ली – भारताचं चंद्रयान ३ मोहिम फत्ते झाल्यानंतर आता जगाला भारताने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगात पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत ३ देश चंद्रावर पोहचले आहेत. मात्र दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश आहे. विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर सध्या चंद्राच्या पृष्ठभागावरून फिरून विविध माहिती गोळा करत आहे.
चंद्रयानच्या प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले. चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे. इस्त्रोने ट्विट करत म्हटलंय की, रोव्हरवर लावलेल्या लेझर ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपने पहिल्यांदा दक्षिण ध्रुवाकडील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर घटक असल्याची पुष्टी केली आहे. Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si, आणि O (ऑक्सिजन) हेदेखील आढळले आहे. आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे. एलआयबीएस उपकरण हे इस्त्रोच्या बंगळुरूतील प्रयोगशाळेत बनवण्यात आले आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम (Al), सल्फर (S), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr) आणि टायटॅनियम (Ti) चे घटक असल्याचा खुलासा झाला आहे. प्रज्ञान रोव्हरमध्ये बसवण्यात आलेल्या 'लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप' (LIBS) यंत्राद्वारे ऑक्सिजनचा शोध लागला आहे. पृथ्वीवर माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचे आहे. तेच आता चंद्रावर सापडल्याने भारताच्या मिशनला मोठे यश येताना दिसत आहे.