जगातील फक्त तीन देशांनाच जमलेली अँटी सॅटेलाइट मिसाईलची यशस्वी चाचणी करून भारतानं आपली 'शक्ती' दाखवून दिली आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या या पराक्रमामुळे अनेकांचं धाबं दणाणलं आहे. चिनी ड्रॅगनही बिथरला आहे. ही चाचणी कशी चुकीची होती, हे भासवण्याचा आपले 'शेजारी' प्रयत्न करताहेत. अशातच, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'मिशन शक्ती'वर टीकेचे बाण सोडले. 'भयंकर घटना' असा भारताच्या चाचणीचा उल्लेख केला. त्याला इस्रोनं जशास तसं उत्तर दिलंय. अंतराळातील कचऱ्यावरून भारताचा उपदेश करणाऱ्या नासाचाइस्रोनं जवळपास कचराच करून टाकलाय.
'मिशन शक्ती' फत्ते... आता पुढे काय?
भारताने गेल्या आठवड्यात उपग्रहविरोधी शस्त्रांच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झालाय. भारताने पाडलेल्या उपग्रहाचे सुमारे ६० तुकडे आतापर्यंत सापडले आहेत. त्यापैकी २४ तुकडे आयएसएसच्या कृत्रिम उपग्रहाच्या कक्षेतील पृथ्वीपासून सर्वात दूर असलेल्या बिदूच्या बाहेर सापडले आहेत. अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असा शेरा नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन यांनी मारला होता. त्यामुळे भारताचं खरंच चुकलंय का, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, इस्रोनं लगेचच त्याचं निरसन केलं आहे. देशाची मान खाली जाईल असं कुठलंही काम आपण केलं नसल्याचंही इस्रो अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे.
'मिशन शक्ती'च्या चाचणीमुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल, अशी माहिती तपन मिश्रा यांनी दिली. बऱ्याचदा लग्नात आपले काही खास मित्रही जेवणाला नावं ठेवतात. आपण जेव्हा काही वेगळं काम करतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला हार घातले जात नाहीत. हा जीवनाचा भागच आहे, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. भारताने अंतराळात ३०० किमी उंचीवर चाचणी केली. तिथे हवेचा दाब खूपच कमी असतो. परंतु, तो कचरा जाळून नष्ट करण्यास पुरेसा आहे, असं त्यांनी नमूद केलं.
प्रचंड राजकीय इच्छाशक्तीशिवाय शक्य नव्हतं 'मिशन शक्ती'
तपन मिश्रा हे अहमदाबादमधील स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे माजी संचालक आहेत. नासाने दिलेल्या इशाऱ्याबाबत नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी 'मिशन शक्ती'चं यश उलगडून सांगितलं.
चीनने ८०० किलोमीटर उंचीवर अँटी सॅटेलाइट टेस्ट केली होती. तिथे हवेचा दाब जवळपास नसतोच. त्यामुळे या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा, पाडलेल्या उपग्रहाचे ३००० तुकडे अजूनही अंतराळात तरंगत आहेत. तसा प्रकार होऊ नये यादृष्टीने भारताने पूर्ण काळजी घेतल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.