नवी दिल्ली : चांद्रयान-२ मोहिमेसाठी ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल चालविली आहे. संपूर्ण स्वदेशनिर्मित अशा या प्रकल्पातून रशियाला पूर्णपणे बाहेर ठेवले जाणार असून, अमेरिकेची केवळ जुजबी मदत घेतली जाणार आहे. डिसेंबर २०१७ किंवा २०१८ च्या पहिल्या सहामाहीत चांद्रयान-२ अंतराळात झेपावेल, असे इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितले. या यानाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा केले जाणार असून, संबंधित डाटा पृथ्वीवर पाठवला जाईल. इस्रोने बाह्य अंतराळ मिशनची मालिकाच हाती घेतली आहे. चांद्रमोहीम हा त्याचाच एक भाग असेल. पृथ्वीचा एकमेव उपग्रह मानल्या जाणाऱ्या चंद्रावर पाण्याचा शोध लावण्यात चांद्रयान-१ मिशन यशस्वी ठरले होते. (वृत्तसंस्था)२०१० च्या करारात बदल; आता रशियाबाहेर...२०१० मध्ये इस्रोने रॉसकॉसमॉस या अंतराळ संशोधन संस्थेशी केलेल्या करारानुसार लुनार लँडरची जबाबदारी रशियाकडे सोपविण्यात आली होती. आॅर्बिटर, रोव्हर आणि जीएसएलव्हीचे प्रेक्षपण इस्रोकडे राहणार होते. त्यानंतर चांद्रयान मिशनमध्ये बदल करण्यात आला. लुनार लँडरचा विकासही इस्रोच करणार असून, चांद्रयान-२ ची पूर्ण बांधणी इस्रोकडेच राहील. काही सेवांसाठी मात्र अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेची मदत घेतली जाईल. एका स्थळाहून उपग्रहावर निगराणी ठेवता येत नाही. त्यासाठी अन्य ठिकाणांहून मदत घेण्याची गरज पाहता अमेरिकेच्या डीप स्पेस नेटवर्कची मर्यादित मदत घेतली जाणार आहे. मात्र, रशियाची कुठलीही मदत घेतली जाणार नसल्याचे कुमार यांनी नमूद केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
चांद्रयान-२ साठी इस्रो आत्मनिर्भरतेकडे
By admin | Published: April 04, 2016 2:41 AM