ISRO Aditya L1 Sun Mission: चंद्रयान ३ च्या अभूतपूर्व यशानंतर काही दिवसांतच इस्रोने अंतराळ संशोधन क्षेत्रात आणखी एका महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आखलेल्या मोहिमेतील आदित्य एल-१ या अंतराळयानाने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या झेप घेतली. पीएसएलव्ही सी-५७ च्या मदतीने आदित्य एल-१ सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सूर्याच्या दिशेने खरा प्रवास सुरू झाला आहे.
आदित्य एल-१ हे काही काळ पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण केल्यानंतर सूर्याच्या दिशेने झेप घेणार आहे. अंतराळात सुमारे १२५ दिवस प्रवास केल्यानंतर हे यान सूर्याजवळच्या लाग्रांज-१ भागाजवळ पोहोचणार आहे. आदित्य L1 चा L1 लाग्रांज पॉइंट १ चे प्रतिनिधित्व करतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील दोन महत्त्वाच्या बिंदूंपैकी हा एक आहे. लाग्रांज-१ भागात कुठल्याही गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नाही. सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने अख्खी सूर्यमाला एकत्र बांधून ठेवली असली तरी लाग्रांज-१ भागात पृथ्वी व सूर्याचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना निरस्त करते. कुठल्याही शक्तीचा प्रभाव अथवा प्रतिरोध नसल्यामुळे आदित्य एल-१ अत्यंत कमी इंधनात आपले काम करू शकेल. बुध व शुक्र हे ग्रह त्या पलीकडे असले तरी या टापूचा आणखी एक फायदा म्हणजे कुठल्याही ग्रहणाशिवाय सूर्याचे निरीक्षण करता येईल. सूर्य कधीही ‘आदित्य’च्या दृष्टीआड जाणार नाही.
आदित्यचा मुक्काम पृथ्वीपासून १५ लाख किमीवर असेल
आदित्य एल-१ च्या मुक्कामाचे ठिकाण पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटरवर असेल. चंद्राचे तीन लाख ८५ हजार किलोमीटर अंतर विचारात घेतले तर हे अंतर चौपट-पाचपट वाटेल; पण सूर्याच्या एकूण अंतरापैकी हे १५ लाख किलोमीटर म्हणजे जेमतेम एक टक्का आहे. कारण, आपण सूर्यापासून तब्बल १५० दशलक्ष अर्थात १५ कोटी किलोमीटर अंतरावर आहोत. १५ कोटी किलोमीटर अंतर पार करून पृथ्वीवर पोहोचायला सूर्यकिरणांना आठ मिनिटे १९ सेकंद लागतात. आदित्य मिशनसुद्धा सोप नाही. सूर्याच्या ठरलेल्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्यला १२५ दिवस लागणार आहेत. हा प्रवास सोपा नाही.
आदित्य एल-१ ला दोन मोठ्या ऑर्बिटमध्ये जायचे आहे
आदित्य एल-१ लोअर अर्थ ऑर्बिटपासून प्रवासाला सुरुवात करेल. चंद्रयान ३ प्रमाणे आदित्य एल-१ पृथ्वीच्या कक्षेत सुरुवातीला भ्रमण करेल. PSLV-XL रॉकेट ठरल्यानंतर आदित्य एल-१ ला LEO मध्ये सोडेल. पृथ्वीच्या कक्षेत १६ दिवस फिरताना पाच ऑर्बिट मॅन्यूव्हर केले जातील. त्यानंतर आदित्य एल-१ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर जाईल. इथून आदित्य एल-१चा हॅलो ऑर्बिटच्या दिशेने प्रवास सुरु होईल. आदित्य एल-१ ला या प्रवासाला सुमारे १०९ दिवस लागतील. आदित्य एल-१ ला दोन मोठ्या ऑर्बिटमध्ये जायचे आहे. हा प्रवास कठीण असेल, असे म्हटले जात आहे.
‘आदित्य एल-१’ मोहिमेत सूर्यनिरीक्षणासाठी सात उपकरणे
आदित्य नावाला पौराणिक संदर्भ असल्याचे सगळे जाणतातच. कश्यप ऋषींची पहिली पत्नी आदितीचा पुत्र म्हणजे आदित्य. भारतीय पुराणात त्याच्या ११ भावांचा उल्लेख आहे. या १२ बंधूंच्या समूहालाही आदित्य म्हणतात. सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जुंपल्याचे आपण मानतो. म्हणजे आठवड्याचे सात दिवस. योगायोग असा की, ‘आदित्य एल-१’ मोहिमेत सूर्यनिरीक्षणासाठी जाणाऱ्या यानावरही सात उपकरणे आहेत. सूर्यापासून सतत उत्सर्जित होणारी ऊर्जा, विशेषत: कोरोना मास इजेक्शन, सौर वारे, सौरकण, किरणोत्सर्ग, चुंबकीय लहरी, आदींचा ही उपकरणे अभ्यास करतील. व्हिजिबल इमिशन लाइव्ह कोरोनाग्राफ (व्हीईसीसी), सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (एसयूआयटी), आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्स्पेरिमेंट (एएसपीईएक्स) आणि प्लाझ्मा अनॅलिसिस पॅकेज फॉर आदित्य (पापा) या चार उपकरणांच्या नावातच त्यांचे उद्देश स्पष्ट आहेत. याशिवाय सोलार लो-एनर्जी तसेच हाय-एनर्जी एक्सरे स्पेक्ट्रोमीटर्स आणि मॅग्नेटोमीटरद्वारे इन-सितू म्हणजे प्रत्यक्ष एल-१ टापूत मिळणाऱ्या नोंदी पृथ्वीवर पाठवल्या जातील.