ISRO: काही दिवसांपूर्वीच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चंद्रयान-3 द्वारे इतिहास रचला. या मोहिमेसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला. चंद्रयान-3 नंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 आणि आता गगनयान मोहिम राबवली जात आहे. आता इस्रो पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पुढील दोन वर्षात इस्रो कोणत्या मोहिमा राबवणार याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सरकारने इस्रोच्या पुढील दोन वर्षांतील अंतराळ मोहिमांची माहिती दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 2024 आणि 2025 मध्ये ISRO कोणत्या मिशन पाठवण्याची योजना आखत आहे हे सांगितले. यामध्ये निसार आणि गगनयान मिशनची सर्वाधिक चर्चा होत आहे.
गगनयान: मानव अंतराळात पोहोचणारगगनयान मोहिमेत तीन जणांना अवकाशात पाठवले जाणार आहे. ही भारताची पहिली मानवी मोहीम असेल. या मोहिमेत यान पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर पाठवण्यात येईल. हे मिशन 3 दिवसांचे असेल. अंतराळात 3 दिवस घालवल्यानंतर सर्व अंतराळवीरांना सुखरूप पृथ्वीवर परत आणले जाईल. या मोहिमेचे काम वेगाने सुरू आहे. गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण (TV-D1) ऑक्टोबरमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. 2025 मध्ये भारतीयांना अंतराळात पाठवण्याचे गगनयान मिशनचे उद्दिष्ट आहे.
निसार: नासा आणि इस्रो सोबत काम करणारइस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांमध्ये NISAR म्हणजेच सिंथेटिक अपर्चर रडार मिशनचाही समावेश आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा यांच्या सहकार्याने इस्रो हे अभियान करत आहे. ड्युअल-फ्रिक्वेंसी रडार इमेजिंग उपग्रहाची रचना आणि प्रक्षेपण हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, यातून मिळणारा डेटा शास्त्रज्ञांना हवामान बदलाचे परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी माहिती देईल. NISAR च्या मदतीने संपूर्ण पृथ्वीचे मॅपिंग 12 दिवसांत करता येईल. हा उपग्रह जानेवारी 2024 मध्ये सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल अशी अपेक्षा आहे.
या मोहिमांचीही तयारी सुरूनिसार आणि गगनयान व्यतिरिक्त इस्रो इतर अनेक मोहिमांवर काम करत आहे. मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, ISRO ने पुढील दोन वर्षांमध्ये या मोहिमा - इनसॅट-3DS, रिसॅट-1B, रिसोर्ससॅट-3, TDS01, SPADEX, Oceansat-3A, IDRSS, GSAT-20 आणि NVS-02 सुरू करण्याची योजना आखली आहे. या सर्व मोहिमांचे नेतृत्व इस्रो करणार आहे. अवकाश क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा परिणाम भारतात दिसून येतोय. स्पेस स्टार्ट-अपची संख्या 2014 मध्ये 1 वरुन 2023 मध्ये 200 पेक्षा जास्त झाली आहे. या भारतीय स्पेस स्टार्ट-अप्समध्ये $124.7 मिलियनची गुंतवणूकदेखील करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.