बंगळुरू/नवी दिल्ली - चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोला आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता. मात्र या अपयशातून सावरत आता इस्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर सध्या वेगाने काम सुरू असून, पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात इस्रोचे चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान लँडरला चंद्राच्या पृष्टभागावार यशस्वीरीत्या उतरवण्यात अपयश आल्यानंतर इस्रोने चंद्रावर पुन्हा एकदा झेप घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी इस्रोने विविध समित्यांची नियुक्ती केली आहे. तसेच तीन उपसमित्यांच्या पॅनलसोबत उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी चांद्रयानासोबत केवळ लँडर आणि रोव्हरच पाठवण्यात येणार आहेत. कारण चांद्रयान-2 मोहिमेवेळी पाठवलेले ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहे. तसेच पुढील सात वर्षांपर्यंत ते कार्यरत राहण्याची शक्यता आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी ओव्हरह्यू कमिटीची बैठक झाली. या बैठकीत उपसमित्यांनी केलेल्या शिफारशींवर चर्चा झाली. या उपसमित्यांनी संचालन शक्ती, सेन्सर, इंजिनियरिंग आणि नेव्हिगेशनबाबत प्रस्ताव देण्यात आलेले आहेत. चांद्रयान-3 चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत इस्रोने दहा प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून या मोहिमेची पूर्वतयारी केली आहे. त्यामध्ये यान उतरवण्याचे ठिकाण आणि लोकल नॅव्हिगेशन यांचा समावेश आहे, असे इस्रोमधील एका शास्त्रज्ञाने सांगितले. चांद्रयान-2 च्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीं विचारात घेऊन लँडरमध्ये काही बदल करण्यात यावेत तसेच यात काही सुधारणा करण्याच्या दिशेने काम करावे, असे या मोहिमेबाबत 5 ऑक्टोबर रोजी प्रसिद्घ करण्यात आलेल्या औपचारिक नोटिशीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेवेळी लँडर चंद्राच्या पृष्टभागावर आदळून तुटला होता. त्यामुळे पुढील मोहिमेसाठी लँडरचे पाय हे अधिक मजबूत करण्यात येणार आहेत. त्यामुळे वेगाने लँडिंग झाले तरी लँडरची मोडतोड होणार नाही. तसेच इस्रो एक नवा रोव्हर आणि लँडर तयार करत आहे. मात्र लँडरचे वजन आणि त्यात लावण्यात येणाऱ्या उपकरणांबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
Chandrayaan 3 : इस्रो पुन्हा भरारी घेणार, चांद्रयान-3 लवकरच अवकाशात झेपावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:38 AM