नवी दिल्ली- भारतानं अवकाश क्षेत्रात आणखी एक गगन भरारी घेतली आहे. स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केलं आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं संध्याकाळी 4.56च्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात भरारी घेतली आहे.विशेष म्हणजे इस्रोच्या अभूतपूर्व यशामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार असून, संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा इस्रोच्या या कामगिरीवर समाधान व्यक्त करत त्यांचं अभिनंदन केले आहे. GSAT-6A या उपग्रहामध्ये सर्वात मोठी संपर्काची यंत्रणा असल्यानं त्याचा दूरसंचार क्षेत्राला फायदा पोहोचणार आहे.GSAT-6Aमुळे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या जवानांना दुस-या दूरच्या भागातील जवानांशी संपर्क साधणं सोपं होणार आहे. GSAT-6Aच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. या इंजिनाचा चांद्रयान-२ मोहिमेतही वापर केला जाण्याची शक्यता आहे. 2066 किलो वजनाचा हा उपग्रह बनवण्यासाठी 270 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. GSAT-6Aहा उपग्रह अवकाशात स्थिरावल्यानंतर त्यांचा संपर्कासाठी फायदा होणार आहे.
ISROची गगन भरारी, GSAT-6Aच्या यशस्वी प्रक्षेपणानं लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 9:28 PM