चंद्र आणि सूर्याला गवसणी घातल्यानंतर आता इस्रोने सूर्यमालेतील रहस्यं जाणण्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. या मिशनच्या माध्यमाने ब्लॅक होल्स आणि न्यूट्रॉन स्टार्सचा अभ्यास केला जाईल. हे देशाचे पहिले एक्स-रे पोलारीमीटर सॅटेलाइट (एक्सपोसॅट) असेल, जे एक जानेवारीला रवाना होईल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, एक्सपोसॅट मिशन पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमाने सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण करेल. महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये इस्रोने अनेक यशांना गवसणी घेतली आहे.
एक्सपोसॅटचा उद्देश विश्वातील 50 सर्वात चमकदार ज्ञात स्त्रोतांचा अभ्यास करणे असा आहे. यात पल्सर, ब्लॅक होल, एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, न्यूट्रॉन तारे आणि नॉन-थर्मल सुपरनोव्हा अवशेषांचा समावेश आहे.
काही एक्स-रे स्त्रोतांच्या ध्रुवीकरणासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी एक्सपोसॅट मिशन आखण्यात आले आहे. हा उपग्रह पाच वर्षांसाठी 500 ते 700 किमीच्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ठेवला जाईल. हे मिशन जगातील अशा प्रकारचे दुसरेच मिशन आहे. यापूर्वी, NASA ने 2021 मध्ये इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोरर लाँच केले होते.
मिळेल नवी माहिती -एक्सपोसॅट मिशनमुळे विश्वातील आणखीही नवीन आणि महत्वाची माहिती आपल्याला मिळेल. हे सध्याच्या स्पेक्ट्रोस्कोपिक आणि वेळेच्या डेटामध्ये ध्रुवीकरणाची डिग्री आणि कोन हे दोन महत्वाचे आयाम जोडेल. यामुळे सूर्यमालेतील ग्रहांसंदर्भात आणखीही विशेष माहिती मिळणे अपेक्षित आहे. जी भविष्यात अत्यंत महत्वाची ठरेल. हे मिशन रमन रिसर्च इंस्टिट्यूट आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटरने एकत्रितपणे तयार केले आहे.