चेन्नई - PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने आणखी एक नवा विक्रम रचला आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. सोमवारी (1 एप्रिल) 9 वाजून 27 मिनिटांपासून हे उपग्रह अवकाशात झेपावले. EMISAT या उपग्रहासोबतच काही परदेशी उपग्रहांचेसुद्धा प्रक्षेपण करण्यात आले आहे.
PSLVC45 द्वारे उपग्रह प्रक्षेपित करता येतात. तसेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रहही प्रक्षेपित करता येतात. PSLVC45 EMISAT या मुख्य उपग्रहासह एकूण 29 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. यामध्ये अमेरिकेचे 24, भारताचा 1, ल्युनिनियाचे 2, स्वित्झर्लंडचा 1 आणि स्पेनचा 1 अशा उपग्रहांचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. यातील EMISAT हा उपग्रह भारतासाठी खास आहे कारण या उपग्रहाच्या साहाय्याने भारताला शत्रूच्या रडारची माहिती सहज मिळणार आहे.
पीएसएलव्ही मालिकेतील हे 47 वं मिशन ठरणार आहे. सर्वप्रथम एमिसॅट अंतराळात 749 किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित केलं जाणार आहे. पुढे हे अंतर कमी करत त्याला उर्वरित 28 उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी 504 किलोमीटर अंतरापर्यंत उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हे पूर्ण मिशन तीन तास चालणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) ‘चांद्रयान-2’ मोहिमेला एप्रिल अखेरचा मुहूर्त भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान 2 या महत्वाकांक्षी मोहिमेला मुहूर्त मिळाला आहे. या मोहिमेतील यानाचे एप्रिल अखेरीस उड्डाण होईल. याबाबतची तयारी सुरू असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली होती. मागील काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे ही मोहिम सातत्याने पुढे ढकलली जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात हे यान उतरविण्याचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान 1 मोहिमेमध्ये चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा शोध लागला होता. चांद्रयान 2 मोहिमे अंतर्गत त्याचा अधिक खोलवर अभ्यास केला जाणार आहे. सिवन म्हणाले, या मोहिमेसाठीची आवश्यक चाचण्या सध्या सुरू आहेत. एप्रिल अखेरीस आम्ही यान सोडण्यासाठी सज्ज असू. चांद्रयान 2 यानाचे वजन जवळपास 3 हजार 290 किलो आहे. यासाठी सुमारे 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.