नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्याविरुद्धच्या मनी लाँड्रिग प्रकरणाच्या चौकशीला वेग आला असतानाच आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्या यांच्या विदेशात असलेल्या संपत्तीची माहिती मिळविण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनसह अन्य काही देशांना विनंती पत्रे (लेटर्स रोगेटरीज) जारी करण्याची तयारी सुरू केली आहे.युनायटेड ब्रेव्हरीजचे चेअरमन असलेले मल्ल्या यांच्या मालकीची स्थावर आणि जंगम मालमत्ता अनेक देशांमध्ये आहे आणि त्या सर्व संपत्तीचा विस्तृत तपशील ईडीने मिळविला आहे आणि याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाचा एक भाग म्हणून दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, अमेरिका, हाँगकाँग आणि फ्रान्स यासारख्या देशांकडून आणखी मदत मिळण्याची ईडीला आशा आहे.यासंदर्भात सक्षम न्यायालयात याचिका दाखल करणे आणि विनंती पत्रे मिळविण्याबाबत ईडी विचार करीत आहे. न्यायालयाने विनंती पत्रे दिल्यानंतर ती काही देशांना पाठविण्यात येतील आणि मल्ल्या यांनी त्या देशांमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तांचा तपशील मागविला जाईल. मनी लाँड्रिगविरोधी कायद्यांअंतर्गत जप्त करता येऊ शकेल, अशी मल्ल्यांच्या मालकीची फार मोठी संपत्ती भारतात तरी नाही आणि जी काही संपत्ती आहे त्यावर सार्वजनिक बँका आपला दावा सांगत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘ईडी’ विनंतीपत्र जारी करणार
By admin | Published: April 04, 2016 2:42 AM