विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण हा मुद्दा चर्चेत नव्हताच; काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:06 AM2021-06-26T07:06:55+5:302021-06-26T07:07:01+5:30
काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक : संघटनात्मक विषयावर चर्चा
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या शुक्रवारी येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पक्षातर्फे कोण असेल हा विषय नव्हता. प्रसारमाध्यमांत मात्र या उलट बातम्या होत्या. या बैठकीला पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस (संघटना प्रभारी) के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
या बैठकीत अध्यक्षपदाचा विषय चर्चेत होता का, असे विचारले असता पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, ‘नाही, त्याची चर्चा झाली नाही. बैठक महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर घेण्यात आली होती.’ राज्यात स्वबळावर लढणार का, यावर पाटील म्हणाले की, तो विषय २०२४ मध्ये समयोचित आहे (२०२४ मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणूक आहे).
राज्यात महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये सत्तेचे वाटप जसे ठरले आहे त्यानुसार अध्यक्षपद काँग्रेसला दिले गेले आहे आणि काँग्रेसचे नाना पटोले हे अध्यक्ष बनले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ते पद सोडले व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनले. तेव्हापासून पक्षाला त्यांच्या वारसावर निर्णय घेता आलेला नाही. याशिवाय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला अध्यक्ष असेल की नाही हेदेखील स्पष्ट नाही. राज्य आणि मुंबई प्रांतीय काँग्रेसचा भर ‘एकला चलो रे’ आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा यावर असताना अखिल भारतीय काँग्रेस समिती त्याला फार महत्त्व देत नाही.
भाजप निवडणूक जिंकणे अशक्य
‘जर आम्ही (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) एकत्र राहिलो, तर बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे आणि इतर महानगरपालिकांची आगामी निवडणूक भाजपला जिंकता येणार नाहीत,’ असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. हा नेता म्हणाला की, ‘पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला याची जाणीव आहे.’