लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मोदी सरकार पुन्हा आल्यास लोकशाही संपेल या काँग्रेसच्या वक्तव्याला जनतेने मान्यता दिली आहे. देशातील जनता ४ जून रोजी इंडिया आघाडीला जनादेश देईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी म्हटले आहे.
खरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाजपने फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी जगण्याशी संबंधित मुद्दे निवडले. आम्हाला विश्वास आहे की, जनता ४ जून रोजी पर्यायी सरकारसाठी जनादेश देईल आणि ‘इंडिया’ आघाडी नवीन सरकार स्थापन करेल. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, जर तुम्हाला महात्मा गांधी आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती नसेल तर कदाचित तुम्हाला संविधानाचीही माहिती नसेल. मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. पक्षाला मला न मागता सर्वकाही दिले नाही, पक्षाचे अध्यक्षपद दिले आहे, असे खरगे म्हणाले.
त्यांनी महात्मा गांधींबाबत वाचलेले नाही
महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि एकतर पंतप्रधान अनभिज्ञ आहेत किंवा त्यांनी वाचलेले नाही. त्यांनी महात्मा गांधी यांचे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचावे.सगळे जग महात्मा गांधींना ओळखते. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासह जगभरात अनेक ठिकाणी महात्मा गांधींचा पुतळा बसविण्यात आला आहे, असे ते म्हणाले.