ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मी हिंदू आहे, असं सांगायला मी घाबरतो असं सांगत अनुपम खेर यांनी भारतातल्या मानसिकतेवर वेगळा प्रकाश टाकला आहे. जर मी सांगितलं की मी हिंदू आहे आणि मी कपाळाला तिलक लावलं, तर माझ्यावर लोक RSS चा असल्याचा शिक्का मारून लोक मोकळे होतील अशी व्यथा खेर यांनी सीएनएन आयबीएनच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
देशामध्ये दादरीची चर्चा होते, जी अत्यंत दुर्दैवी घटना होती. परंतु मालदाचं काय काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचं काय असा सवालही खेर यांनी विचारला आहे.
भारतीय सिनेजगत राजकारणापासून दूर होतं, परंतु २०१४ पासून परिस्थिती बदलल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेने नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ नये म्हणून काहींनी पत्रक काढलं, ज्यावर अनेकांनी सह्या केल्या आणि तेच मोदी प्रचंड मतांनी निवडून आले, त्यामुळे अनेकांची अडचण झाल्याचे खेर म्हणाले.
२०१० मध्ये पद्म पुरस्कारांचा दर्जा घसरल्याची, कुणालाही पुरस्कार दिले जातात अशी टिप्पणी केलेल्या खेर यांनी आता मात्र, पद्मभूषण मिळाल्यावर आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा सन्मान असल्याचं मत व्यक्त केलं आणि त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. परंतु खेर यांनी आपली बाजू मांडताना, २०१० मध्ये अनेक गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तिला पद्म पुरस्कार दिल्याचा निषेध म्हणून तसे ट्विट केल्याचे सांगितले. या व्यक्तिला देशाबाहेर जायची बंदी होती, त्याला पद्म पुरस्कार कसा दिला जातो, असे सांगत त्यामुळे आपण तशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे खेर म्हणाले.