संपूर्ण जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरू लागले आहे. कोरोनाकाळात अनेकांची वाताहत झाली. आरोग्य यंत्रणा तोकड्या पडल्या. मात्र, नियमित योगाभ्यास करणाऱ्यांची या संकटातून सहीसलामत सुटका झाली. त्यामुळेच यंदाच्या सातव्या जागतिक योग दिनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. योगविद्येचा अधिकाधिक प्रसार व्हावा या उद्देशाने आता केंद्र सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या साह्याने ‘एमयोग’ हे ॲपही विकसित केले आहे.
एमयोग ॲप कशासंदर्भात आहे?
योगविद्या, योगासने यांविषयी जाणून घेण्याची ज्यांना जिज्ञासा आहे, ज्यांना योगासने शिकायची आहेत, त्यांच्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. या ॲपमध्ये विविध योगासनांचे व्हिडिओ तसेच ऑडिओ आहेत.जिज्ञासूंना त्यांना हव्या त्या वेळी आणि हव्या त्या ठिकाणी किंवा घरातील सुरक्षित वातावरणात ॲपवरील योगासनांचे व्हिडिओ पाहता आणि त्यानुसार योगासने शिकताही येतील. १२ ते ६५ या वयोगटातील लोकांना या ॲपद्वारे योगशिक्षण घेणे सहज शक्य होणार आहे.
हे ॲप कसे विकसित केले गेले?
एमयोग ॲप केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. शास्त्रीय दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मते यांच्या संयोगातून ॲप तयार करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ॲपच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय व डब्ल्यूएचओ प्रयत्न करत होते.
डेटा प्रायव्हसीचे काय?
एमयोग ॲप वापरकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारच्या डेटाची मागणी करत नाही. गुगल प्ले स्टोअरमध्ये हे ॲप उपलब्ध आहे. वापरकर्त्याला हे ॲप डाऊनलोड करताना त्याची कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती मागितली जात नाही.