मेघालय: एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या आजीला भेटायला जाणे, हा गुन्हा आहे का, असा सवाल विचारत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्यांना फटकारले. ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत डाव्यांची सत्ता उलथवून लावण्याचा पराक्रम करून दाखवला. या पार्श्वभूमीवर गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. कोणताही नेता आपल्या कार्यकर्त्यांना अशा निर्णायक क्षणी सोडून जात नाही. राहुल गांधी हे गांभीर्य नसलेले पक्षाध्यक्ष आहेत, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले. त्याला प्रत्युत्तर देताना अहमद पटेल यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्यावर होणारे सर्व आरोप निराधार आहेत. एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या आजीला भेटायला जाणे हा काही गुन्हा आहे का? गिरीराज सिंह यांना वायफळ बडबड करण्याशिवाय काही काम उरलेले नाही, असे पटेल यांनी म्हटले.राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विट करून आपण इटलीत आजीला भेटायला जाणार असल्याचे सांगितले होते. होळीच्या सुट्टीसाठी मी 93 वर्षीय आजीकडे जाणार आहे. ती दयाळू आहे. मी आजीला भेटायला जाऊन सरप्राइज देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आजीला भेटायला जाणे हा गुन्हा आहे का? अहमद पटेलांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 5:26 PM