चेन्नई - डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडींनंतर संतप्त झालेल्या डीएमकेच्या समर्थकांनी प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. प्राप्तिकर विभागाने आज संध्याकाळी डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या थुतिकुडी येथील निवासस्थानावर धाड टाकली. दरम्यान, कनिमोझी यांच्या निवासस्थानी घातलेल्या धाडींवरून कनिमोझींचे बंधू आणि डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. भाजपाचे तामिळनाडू अध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन यांच्या निवास्थानी कोट्यवधी रुपये लपवलेले आहेत. तिथे धाडी का टाकल्या जात नाहीत. पंतप्रधान मोदींकडून प्राप्तिकर विभाग, सीबीआय, न्यायपालिका आणि आता निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केल जात आहे, असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.