ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणा-या मृत्यूच्या बातम्या नेहमी कानावर येत असतात. पण हे अपघात होऊ नयेत यासाठी ना महापालिका, ना राज्य सरकार कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही. लोकांमध्येही याबाबत रोष आहे, मात्र एखादं आंदोलन, निषेध व्यक्त केला की तेदेखील आपल्या नेहमीच्या आयुष्यात व्यस्त होतात. ज्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती या खड्ड्यांमुळे जखमी किंवा मृत्यूमुखी पडली असेल त्यांच्यासाठी हा प्रश्न गंभीर असू शकतो. मात्र हैदराबादमधील एक 12 वर्षाचा मुलगा काहीही संबंध नसताना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करत आहे.
रवी तेजा असं या 12 वर्षाच्या मुलाचं नाव आहे. तो खड्डे का भरतोय यामागची कहाणीही तितकीच भावनिक आहे. रवी तेजा राहत असलेल्या परिसरात एका चिमुरड्याचा खड्ड्यामुळे रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. रवी तेजाच्या डोळ्यांदेखत हा अपघात झाल्याने त्याला खूप मोठा धक्का बसला. यानंतर पुढे कधीपुन्हा कोणाचा असा दुर्देवी मृत्यू होऊ नये यासाठी रवी तेजाने स्वत: परिसरातील खड्डे भरण्यास सुरुवात केली.
Hyderabad: Moved by recent death of a toddler in his state, 12-years-old takes it upon himself to fill potholes on Habsiguda's main road. pic.twitter.com/GCHHFixslI— ANI (@ANI_news) July 2, 2017
एक दांपत्य आपल्या चिमुरड्यासोबत दुचाकीवरुन जात होतं. यावेळी रस्त्यात आलेल्या अनपेक्षित खड्ड्यामुळे त्यांचा तोल गेला. अपघातात जखमी झालेला तो चिमुरडा जगू शकला नाही. या अपघाताचा रवी तेजा साक्षीदार होता. चिमुरड्याच्या मृत्यूने हेलावलेल्या रवी तेजाने परिसरातील सर्व खड्डे भरुन काढण्याचा निर्धार केला. इतकंच नाही त्याने त्यादृष्टीने काम करण्यासही सुरुवात केली. कोणाच्याही नशिबी असा मृत्यू येऊ नये असं रवी तेजा सांगतो. परिसरातील सर्व खड्डे जोपर्यंत भरुन काढणार नाही, तोपर्यंत आपलं काम सुरु ठेवण्याचं रवी तेजाने ठरवलं आहे.
Recently a family travelling on bike fell on road due to pothole.Don’t want anyone to die this way, will continue filling potholes:Ravi Teja pic.twitter.com/FmV5Mx4Ibi— ANI (@ANI_news) July 2, 2017
रवी तेजाच्या या उपक्रमाचं परिसरात तसंच सोशल मीडियावर भरभरुन कौतुक केलं जात आहे. काहीजणांनी एकीकडे दगड जीव घेत असताना, काही दगड जीव वाचवत आहेत असं म्हटलं आहे. रवी तेजाकडे पाहून अनेकांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.