चेन्नई : अनेक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी पगारवाढ आणि बढतीचे (Salary Increment and Promotion) गिफ्ट देतात, पण काही कंपन्या अशा आहेत. ज्या पगारवाढीसोबत सरप्राईज गिफ्टही देतात.
चेन्नईस्थित एका आयटी कंपनीने (Chennai Based IT Company) सोमवारी आपल्या 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली आहे. या कर्मचाऱ्यांनी कंपनीसोबत स्टेप बाय स्टेप काम केल्यामुळे आणि कंपनीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कार गिफ्ट देण्यात आले. Ideas2IT नावाच्या या कंपनीने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी कार भेट दिली.
"आम्ही आमच्या 100 कर्मचाऱ्यांना 100 कार गिफ्ट देत आहोत. हे सर्व कर्मचारी 10 वर्षांहून अधिक काळ आमच्यासोबत आहेत. आमच्या संस्थेत 500 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून आपण जे कमावले आहे, ते या कर्मचाऱ्यांना परत केले पाहिजे, असे आमचे मत आहे", असे कंपनीचे मार्केटिंग हेड हरी सुब्रह्मण्य यांनी सांगितले.
Ideas2IT चे संस्थापक आणि अध्यक्ष मुरली सुब्रह्मण्यम म्हणाले की, कर्मचार्यांनी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कंपनीला अधिक उंचीवर नेले आहे आणि आता आम्ही त्यांना कार गिफ्ट देत नाही, तर त्यांनी त्यांच्या मेहनतीने जे कमावले आहे ते आम्ही त्यांना परत करत आहोत.याचबरोबर, "7-8 वर्षांपूर्वी आम्ही वचन दिले होते की जेव्हा कंपनी चांगली उद्दिष्टे साध्य करू लागेल, तेव्हा आम्ही आमचे पैसे त्यांच्यासोबत शेअर करू. त्यामुळे कार गिफ्ट देणे हे या दिशेने पहिले पाऊल आहे. भविष्यातही आम्ही अशाप्रकारे पुढाकार घेऊ", असेही मुरली सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.
कंपनीकडून कार गिफ्ट मिळालेले कर्मचारी प्रसाद म्हणाले, कंपनीकडून गिफ्ट मिळणे नेहमीच छान असते. प्रत्येक प्रसंगी कंपनी सोन्याची नाणी, आयफोन सारख्या गिफ्ट देऊन आपला आनंद शेअर करते, पण कार ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. दरम्यान, याआधी चेन्नईतील आणखी एका कंपनीने आपल्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांना BMW कार गिफ्ट केली होती. या एका कारची किंमत सुमारे एक कोटी रुपये होती.