चेन्नई - अशा फार कमी कंपन्या असतात ज्या आपल्या कर्मचार्यांचे त्यांच्या निष्ठेबद्दल केवळ आभारच मानत नाहीत, तर त्यांना महागडे गिफ्ट्सदेखील देतात. अशाच एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या कार गिफ्ट केल्या आहेत.
गिफ्ट केल्या बीएमडब्ल्यूकार -चेन्नईतील एका आयटी फर्मने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल BMW कार भेट दिली आहे. या सॉफ्टवेअर फर्मने 5 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कार (BMW Car) गिफ्ट केली. Kissflow Inc. असे या कंपनीचे नाव आहे. ही एक ग्लोबल सॉफ्टवेयर कंपनी आहे.
प्रामाणिकतेचा सन्मान - कंपनीने कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा एक कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार देऊन सन्मान केला. खरे तर हे गिफ्ट देण्याच्या काही तास आधीच कंनीने संबंधित कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. या पाच कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना, किसफ्लो इंक.चे सीईओ सुरेश संबंदम म्हणाले, या लोकांनी आमच्यासोबत अनेक आव्हानांचा सामना केला आहे आणि कोविड महामारीच्या काळातही कंपनीसाठी ठामपणे उभे राहिले.
विशेष म्हणजे, कंपनीने या पाचही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह BMW 530d कारची चावी दिली. 'इंडिया डॉट कॉम'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संबंधित कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची प्रचंड काळजी घेते आणि त्यांना नेहमीच चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करते. महत्वाचे म्हणजे, आणखी काही कर्मचाऱ्यांनाही BMW 6 सिरीजची कार गिफ्ट करण्यात येणार आहे.