भुवनेश्वर - ओडिशातील आयकर विभागाने दारुच्या व्यवसायाशी निगडीत एका कंपनीच्या आणि तिच्याशी संबंधित इतर तीन उद्योग समुहाच्या ठिकाणांवर बुधवारी छापेमारी केली. या कंपन्या राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित आहेत, ते काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. आयकर अधिकाऱ्यांनी सकाळी ७ वाजताच ओडिशातील ४ आणि झारखंडमधील २ ठिकणांवर धाड टाकली. त्यानंतर, घटनास्थळावर कारवाई सुरू करण्यात आली असून मोठी रोकड जप्तही करण्यात आली आहे. याप्रकरणी, विभागाने अधिकृत माहिती दिली असून आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांच्या नोटींची मोजणी पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
आयकर (आय-टी) विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौध डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकला असून कालपर्यंत कंपनीशी संबंधित कार्यालयातून चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आयटी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर व झारखंडमधील रांची, लोहरदगा येथे शोधमोहीम सुरू आहेत. आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांपर्यंतच्या नोटांची मोजणी पूर्ण झालीअसून नोटांची संख्या अधिक आहे. मात्र, नोटा मोजणाऱ्या मशीन्सही बंद झाल्याने नोटा मोजायचं काम सध्या थांबवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
कंपनीने उत्पादन आणि व्यापार संबंधित व्यवहारातून टॅक्सचोरी केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला असून याप्रकरणी दस्तावेजही हस्तगत करण्यात आले आहेत. बीडीपीएल कंपनीचे मुख्यालय ओडिशा येथे आहे. या कंपनीसह आणखी ४ कंपन्या आहेत. बलदेव साहू इंफ्रा लिमिटेड, क्वॉलिटी बॉटलर्स आणि किशोर प्रसाद-विजय प्रसाद बिवरेज लिमिटेड यांचा समावेश आहे. बलदेव साहू इंफ्र लिमिटेड ही कंपनी फ्लाई ऐश ब्रिक्सचं काम करते. तर, उर्वरीत तीन कंपन्या मद्य उत्पादन संबंधित कामाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळेच, आयकर विभागाने बीडीपीएल समुहाशी संबंधित सर्वच कंपन्यांवर छापेमारी केली आहे.