इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; ममता-नितीश-अखिलेश यांच्या नकारानंतर खर्गेंचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 01:37 PM2023-12-05T13:37:05+5:302023-12-05T13:40:09+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी दिल्लीत ही बैठक बोलावली होती.
नवी दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक बोलावली होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीआधी इंडिया आघाडीत नाराजीचा सूर असल्याची चर्चा देखील रंगली होती.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमत्री अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. नितीश कुमार यांच्या जागी जेडीयूचे लल्लन सिंह आणि संजय झा आणि अखिलेश यांच्या जागी सपाकडून राम गोपाल यादव बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र, आता खर्गे यांनी ही बैठक पुढे ढकलली आहे.
ममता बॅनर्जींची असमर्थता-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत अनुपस्थित राहण्याचे संकेत दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार देत 'इंडिया' आघाडीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये ६ ते ७ दिवसांचा कार्यक्रम आहे. मी इतर योजना देखील केल्या आहेत. आता जर त्यांनी मला बैठकीसाठी बोलावले तर मी माझे कार्यक्रम कसे बदलता येईल?, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी असमर्थता दर्शवली आहे.
भाजपाचा मुकाबला करण्यासाठी २६ पक्ष एकत्र-
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, TMC, RJD, JDU, AAP, SP, DMK असे २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या युतीला 'इंडिया' युती असे नाव देण्यात आले आहे. 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली. दुसरी बैठक बेंगळुरू येथे तर तिसरी बैठक मुंबईत झाली. यानंतर खर्गेंनी यांनी ६ डिसेंबर रोजी दिल्लीत चौथी बैठक बोलावली होती.