BJP vs Congress, Dr. Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते. भारतीय अर्थक्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्यावरून काही अंशी वादविवाद सुरु आहेत. या साऱ्या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसला सुनावले.
सुधांशू त्रिवेदी म्हणाला, "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशाच्या आर्थिक विकासाचा पाया रचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना योग्य तो सन्मान देण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने काल झालेल्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक आणि समाधी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे काँग्रेस पक्षाला सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना माहिती दिली."
"सरकारने स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आता भूसंपादन ट्रस्ट आणि जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती वेळात हे काम केले जाईल याचा अंदाज देण्यात आला आहे. ज्या काँग्रेस पक्षाने डॉ. मनमोहन सिंग यांचा त्यांच्या हयातीत कधीही सन्मान केला नाही, ते काँग्रेस आज त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या संदर्भात राजकारण करत आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. डॉ. मनमोहन सिंग गांधी हे नेहरू कुटुंबाबाहेरचे पहिले पंतप्रधान होते, ज्यांनी १० वर्षे पंतप्रधानपद भूषवले. काँग्रेस पक्षाने नेहरू-गांधी घराण्याबाहेरील कोणत्याही पंतप्रधानाला आदर दिला नाही," असे त्रिवेदी यांनी सुनावले.
"आमच्या सरकारचा विचार करता पंतप्रधान मोदींच्या सरकारने पक्षीय भावनांच्या पुढे जात सर्व नेत्यांचा आदर केला आहे. डॉ. मनमोहन सिंग जी यांना त्यांच्या कार्यकाळात ज्या प्रकारे वागणूक मिळाली, ते देशाने पाहिले आहे. निदान आज तरी या दु:खाच्या काळात राजकारण करणे थांबवले पाहिजे," असे ते म्हणाले.