महाराष्ट्राचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी लोक न्यायालयांना आणि न्यायाधीशांना मंदिर-देवासमान मानत असल्यावरून मोठे वक्तव्य केले आहे. हे सर्वात जास्त धोक्याचे असल्याचे चंद्रचूड म्हणाले आहेत.
कोलकातामधील राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या परिषदेत ते बोलत होते. अनेकदा आपल्याला आदरणीय किंवा लॉर्डशिप किंवा लेडीशिप म्हणून संबोधले जाते. न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ते खूप धोक्याचे असते. त्या मंदिरांमध्ये आपण स्वत:ला देव म्हणून पाहू लागणे हे फार धोकादायक आहे. न्यायाधीशांचे काम सार्वजनिक हिताचे काम करणे आहे, देव बनण्याचे नाही, असे चंद्रचूड यांनी सांगितले.
आयएएनएस वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. यानुसार सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे, असे मला जेव्हा सांगितले जाते तेव्हा मला संकोच वाटतो. कारण मंदिरात न्यायाधीशांना देवाच्या दर्जाचे मानले जाते. जेव्हा तुम्ही स्वत:ला लोकांची सेवा करणारे मानता तेव्हा तुम्ही करुणा, सहानुभूती, न्याय करण्याची भावना बाळगू शकता. परंतू दुसऱ्यांसाठी निर्णयात्मक होऊ शकत नाही.
एखाद्या गुन्हेगारी खटल्यात एखाद्याला शिक्षा सुनावतानाही न्यायाधीश सहानुभूतीच्या भावनेने तसे करतात कारण एका माणसाला ही शिक्षा दिली जात असते. माझ्या मते या घटनात्मक चारित्र्याच्या संकल्पना केवळ सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठीच नव्हे तर जिल्हा न्यायव्यवस्थेसाठीही महत्त्वाच्या आहेत. कारण सामान्यांची न्यायपालिकेतील भागीदारी ही जिल्हा न्यायालयांपासून सुरु होते, असे सरन्यायाधीश यांनी स्पष्ट केले.