नवी दिल्ली ( Marathi News ): पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत न करणे यात कोणतीही क्रूरता नाही. वेगवेगळी धार्मिक मते तसेच धारणा असणे आणि काही धार्मिक कर्तव्यांचे पालन न करणे याला क्रूरता म्हणता येणार नाही, असे दिल्लीउच्च न्यायालयाने एका प्रकरणात नुकतेच सुनावले आहे.
पत्नीने करवा चौथचे व्रत न केल्याने पतीने थेट कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरीही दिली. यात पतीने पत्नीवर क्रूरपणाचा आरोप केला होता. पत्नीने आपल्याला क्रूर म्हणण्याबाबत आक्षेप घेत या कोर्टाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
काय होती तक्रार?
पतीने पत्नीवर केवळ करवा चौथचे व्रत न केल्याचा उल्लेख केला होता. मोबाइल रिचार्ज न केल्याच्या रागातून पत्नीने करवा व्रत न धरल्याचे पतीने म्हटले होते. तसेच लहानसहान गोष्टींवरून पत्नी नाराज होऊन कुटुंबातील अन्य सदस्यांशी सतत भांडत करत असे, असेही त्याने म्हटले होते.
पतीला आजार, पत्नीने कुंकू लावणे केले बंद
पतीने न्यायालयात सांगितले की, २००९ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. २०११ मध्ये त्यांना मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर पत्नीने काही दिवसात पतीचे घर सोडले होते. एप्रिल २०११ मध्ये पतीला मणक्याचा आजार झाला असता, पत्नीने कुंकू लावणे बंद करून आपण विधवा झाल्याचे जाहीर करून टाकले होते. हे अनुभव पाहता, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश कुमार कैत आणि न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांनी घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला. लग्नानंतर एक महिना आणि तीन महिन्यांनंतर सासर सोडून परतणे किंवा समेटासाठी अजिबात प्रयत्न न करणे, या बाबी गंभीर असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.
कशी ठरते क्रूरता?
- पती वा पत्नीने शारीरिक संबंध न ठेवण्यासाठी एकतर्फी नकार देणे. - विवाहानंतर मूल होऊ न देण्याचा निर्णय पती किंवा पत्नी यांनी घेणे. - एकमेकांना न सांगता पती किंवा पत्नीने नसबंदी करणे - दोघांमध्ये एकत्र राहता न येण्याइतपत तणाव येणे. - दीर्घकाळ एकमेकांमुळे नाराज तसेच निराश होणे. - सातत्याने एकमेकांवर कोणताही आरोप करुन भांडत राहणे. - आपल्या सुखासाठी परस्परांचा छळ करणे. (वृत्तसंस्था)